बलात्काराच्या गुन्ह्यामुळे अडचणीत आलेले दाती महाराज यांनी बुधवारी या वादावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. मला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्यात आले, असा दावा त्यांनी केला. नवीन गुप्ता आणि सचिन जैन हे माझ्याकडून ३२ कोटी रुपये मागत होते आणि पण मी ते देण्यास नकार दिल्याने माझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला, असे दाती महाराजांनी म्हटले आहे.

दिल्लीतील स्वयंघोषित संत दाती महाराजवर एका शिष्येने बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणी दाती महाराज मंगळवारी पोलिसांच्या कार्यालयात हजर झाले. सुमारे सात तास त्यांची चौकशी झाली. बुधवारी दाती महाराज यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, माझ्या आश्रमात पूर्वी अभिषेक अग्रवाल नामक व्यक्ती होता. अभिषेक माझा विश्वासू सेवक होता. पण त्याने याचा गैरफायदा घेतला.  अभिषेकने माझ्या नावावर लोकांशी आर्थिक व्यवहार केले होते. आता अभिषेकने थकवलेले पैसे मी परत करावे, यासाठी काही जण माझ्या मागे लागले होते. यात नवीन गुप्ता आणि सचिन जैन हे दोघे आघाडीवर होते. या दोघांनी माझ्याविरोधात हा कट रचला आहे. सचिन जैनने मला ५ मेला देखील धमकी दिली होती, असे दाती महाराजांचे म्हणणे आहे.

दाती महाराज पुढे म्हणाले, ते दोघेही माझ्याकडून ३२ कोटी रुपये मागत होते. पण मी त्यांना सांगयचो की माझ्याकडे त्यांना देण्यासाठी काहीच नाही. माझ्याकडे एक रुग्णालय असून ते विकून तुम्ही पुन्हा स्वत:च्या पायावर उभे राहा असं मी त्यांना सांगायचो. पण ते दोघेही माझं ऐकत नव्हते. मला त्यांच्याकडून वारंवार धमकी येत होती. त्यांनी माझ्यावर जो दबाव टाकला तो खरंच भीतीदायक आहे, असेही दाती महाराज यांनी म्हटले आहे. मी महिलांचा अपमान करु शकत नाही. मी तर मुलींसाठी शाळा, महाविद्याल आणि आता मेडिकल कॉलेज बांधण्यासाठी प्रयत्न करत आहे, असा दावाही त्यांनी केला. तक्रारदार तरुणी, नवीन गुप्ता आणि सचिन जैन या तिघांचे कॉल रेकॉर्ड तपासून बघितल्यास सत्य जनतेसमोर येईल, असेही त्यांनी नमूद केले.