हिंदू हा शब्द उच्चारला तर आपल्यावर जातीयवादाचा शिक्का बसेल, अशी भीतीच काहीजणांना वाटते. मात्र, आपल्या देशाला हिंदुस्थान म्हणतात. हा हिंदुस्थान आहे आणि तो पाकिस्तान आहे, हे लक्षात घ्यावे, असे प्रतिपादन व्यंकय्या नायडू यांनी केले. ते शनिवारी बंगळुरूमधील एका कार्यक्रमात बोलत होते. आता नायडू यांच्या वक्तव्यावर विरोधक कशाप्रकारे व्यक्त होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वी नायडू यांनी पाचशे व हजारांच्या नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन करताना काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला होता. पाचशे व हजारांच्या नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेस संभ्रम का निर्माण करत आहे, असा सवाल व्यंकय्या नायडू यांनी उपस्थित केला होता. ते किंतु-परंतु का करत आहेत ? यामुळे काहीच चांगलं होणार नसल्याचे त्यांनी म्हटले. हा गरीबांच्या हितासाठी घेतलेला निर्णय आहे. चलनविरहित अर्थव्यवस्था करण्यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असताना काँग्रेस सर्वसामान्यांमध्ये का संभ्रम निर्माण करत आहे, असा थेट सवाल त्यांनी केला होता.