दिल्लीचे माजी विधिमंत्री सोमनाथ भारती यांच्याविरुद्ध घरगुती हिंसेच्या आरोपांवरून गेले काही दिवस सुरू असलेल्या कारवाईबाबत अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी भाष्य केले. सोमनाथ भारती यांचे वर्तन आम आदमी पक्षासाठी (आप) लज्जास्पद गोष्ट असल्याचे केजरीवाल यांनी ट्विटरवरून सांगितले. सोमनाथ यांनी आता पोलिसांना शरण गेले पाहिजे. ते त्यांच्यापासून का पळत आहेत?, जेलमध्ये जाण्यास ते इतके का घाबरत आहेत, असे सवाल उपस्थित करत केजरीवाल यांनी भारतींचे वर्तन पक्ष आणि त्यांच्या कुटुंबियांना मान खाली घालायला लावणारे असल्याचे म्हटले. याशिवाय, त्यांनी आता पोलिसांना सहकार्य केले पाहिजे, असेही सांगितले. दिल्ली पोलिसांकडून मंगळवारी भारती यांना हुडकून काढण्यासाठी शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. भारती यांची पत्नी लिपिका यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांच्याविरुद्ध मारहाणीची तक्रार दिली होती. त्यानंतर भारती यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, जोपर्यंत न्यायालयात याप्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत जगासमोर येणार नाही, अशी भूमिका सोमनाथ भारती यांनी घेतली आहे.