दिल्लीचे माजी विधिमंत्री सोमनाथ भारती यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला असतानाच त्यांच्याविरुद्ध दुसऱ्या न्यायालयाने अजामीनपात्र वॉरण्ट जारी केल्याने भारती यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भारती यांच्याविरुद्ध घरगुती हिंसाचार आणि खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा त्यांच्या पत्नीने नोंदविला असून त्याबाबत भारती यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास सोमवारी दिल्ली न्यायालयाने नकार दिला. तर दिल्ली पोलिसांनी केलेला अर्ज स्वीकारून महानगर दंडाधिकारी मणिका यांनी भारती यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरण्ट जारी केले.
अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती संजय गर्ग यांनी भारती यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. ते दिल्लीचे माजी विधिमंत्री आहेत आणि ते फरार होण्याची शक्यता नाही, असे न्यायमूर्ती म्हणाले. पत्नी आणि मुलांची जबाबदारी स्वीकारण्यास भारती तयार आहेत आणि तडजोड करण्याचीही त्यांची तयारी आहे, असे भारती यांच्या वकिलांनी न्यायालयास सांगितले.