घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात तडजोड करण्यास आपली तयारी नसल्याचे दिल्लीचे माजी कायदामंत्री सोमनाथ भारती यांच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. भारती हे आम आदमी पक्षाचे नेते आहेत.
सरन्यायाधीश एच.एल.दत्तू यांनी भारती यांच्या पत्नी लिपिका मित्रा यांच्या निवेदनाची नोंद घेतली आहे व आमदार भारती यांच्या याचिकेला काही अर्थ नाही कारण त्यांनी शरणागती पत्करलेली आहे, असे दत्तू यांनी सांगितले. भारती यांच्या पत्नी लिपिका यांना मध्यस्थीने वाद मिटवायची तयारी आहे का, अशी वितारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी नकारार्थी उत्तर दिले.
न्यायालयाने नंतर भारती यांचे वकील विजय अग्रवाल यांना असे सांगितले, की भारती यांना नियमित जामीन मिळण्यासाठी आता कनिष्ठ न्यायालयात जावे. याचिका दाखल केली तर संबंधित न्यायाधीशांना त्यावर विचार करण्यास सांगितले जाईल. भारती यांना अतंरिम जामीन मिळावा यासाठी त्यांच्या वकिलाने केलेली तोंडी विनंती सर्वोच्च न्यायालयाने १ ऑक्टोबरला फेटाळली होती.