पेन्शनमध्ये भागीदारी दिली नाही म्हणून मुलाने आपल्या आई-वडिलांची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बिहारमधील बिहटा या ठिकाणी मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. आई-वडिलांची हत्या करुन आरोपी मुलगा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

रेल्वेचे निवृत्त कर्मचारी राहिलेले मुनारिका यादव यांनी आपला लहान मुलगा अवधेश यादव याला पेन्शनमधील हिस्सा नाकारला होता. मुनारिका यादव हे आपल्या पत्नीसह मोठा मुलगा रमेश याच्या घरी राहायचे, त्यांना दरमहिन्याला १५ हजार रुपये पेन्शनच्या स्वरुपात मिळत होते. हा पैसा ते मोठा मुलगा रमेश याच्या घरखर्चावर आणि आपल्या नातवंडांवर खर्च करायचे. त्यामुळे अवधेश संतापला होता. अवधेश हा तेथून जवळच राहायचा. मंगळवारी त्याचं पेन्शनच्या पैशांवरुन वडिलांसोबत भांडण झालं होतं, त्यानंतर रात्री उशीरा अवधेश हा रमेशच्या घराजवळ आला आणि घराबाहेर झोपलेल्या आई-वडिलांवर त्याने गोळीबार केला. गोळीच्या आवाजाने रमेश आणि परिसरातील लोक जागे झाले आणि त्यांनी रक्तबंबाळ अवस्थेतील वृद्ध दांपत्यांना पाहिलं. त्यानंतर सर्वांनी अवधेशचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण रात्रीची वेळ असल्याने तो पसार झाला.

निवृत्त झाल्यानंतर म्हणजे 10 वर्षांपूर्वी मुनारिका यांना २२ लाख रुपये पेन्शन मिळाली होती. त्यावेळी त्यांनी हे पैसे दोन्ही मुलांमध्ये वाटून दिले आणि काही पैसे स्वतःच्या आणि पत्नीच्या म्हातारपणासाठी ठेवले होते. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर अवधेशने दुसरं लग्न केलं होतं. तेव्हापासून मुनारिका हे मोठ्या मुलासोबत राहत होते अशी माहिती आहे.  गेल्या काही महिन्यांपासून अवधेश महिन्याला मिळणाऱ्या पेन्शनच्या पैशांसाठी वडिलांकडे तगादा लावत होता, आणि त्यावरुन तो संतापालही होता अशी माहिती आहे. पोलीस आरोपी मुलाचा शोध घेत आहेत.