लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी गेल्या आठवडय़ात श्रीनगर- जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील सरकारी इमारतीवर हल्ला केला असता, आत अडकून पडलेले १०० कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांच्यात युनायटेड जिहाद कौन्सिलचा सर्वोच्च नेता सय्यद सलाहउद्दीन याचा मुलगा सय्यद मुईन याचाही समावेश होता.
पांपोरमधील जम्मू- काश्मीर उद्योजकता विकास संस्थेत माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक म्हणून काम करणारा मुईन हा शनिवारी त्याच्या सहकाऱ्यांसह दुपारची नमाज पढत असताना तीन अतिरेकी महामार्गावर सीआरपीएफच्या ताफ्यावर गोळीबार केल्यानंतर या इमारतीत शिरले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दहशतवादी या परिसराच्या बहुमजली इमारतीत शिरल्यानंतर महिलांसह तेथील सुमारे २० कर्मचारी घाबरले आणि मुईनसह काही जण नमाज अर्धवट सोडून खाली पळाले. दहशतवाद्यांनी त्यांना मोबाइल फोन खाली टाकून इमारतीतून निघून जाण्यास सांगितल्यानंतर, हे कर्मचारी मागील बाजूने वसतिगृहाच्या इमारतीत लपले, अशीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली.