दिल्लीमधील निहाल विहार परिसरात सात वर्षाच्या मुलीच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी खुलासा केला आहे. बलात्कार केल्यानंतर मुलीची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले दोघे आरोपी मुलगा आणि वडील आहेत. मुलगा या घटनेतील मुख्य आरोपी आहे ज्याने मुलीला अमिष दाखवत घरी आणलं आणि अत्याचार केला. मुलाने केलेल्या गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतरही वडिलांनी गुन्हा लपवून ठेवत मुलीची हत्या केली आणि एका पार्कमध्ये मृतदेह लपवून ठेवण्यास मदत केली.
काय आहे प्रकरण –
मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी शनिवारी बेपत्ता झाली होती. पीडित मुलगी आपल्या बहिणीसोबत दुकानात गेली होती. घरी परतली तेव्हा बहिण घरी पोहोचली पण मुलगी आली नव्हती. यादरम्यान रस्त्यात आरोपीला मुलगी दिसली. त्याने खाऊ देण्याचं अमिष दाखवत तिला आपल्या घरी नेलं आणि अत्याचार केला. मुलीवर बलात्कार करत असताना आरोपीच्या वडिलांनी पाहिलं होतं. मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी मुलासोबत मिळून मुलीची हत्या केली. दुसरीकडे मुलगी बराच वेळ घरी आली नसल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरु केली. बराच वेळ शोधूनही पत्ता न लागल्याने अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
रविवारी पोलिसांना एका नाल्याशेजारी मुलीचा मृतदेह आढळला. आरोपींचा शोध लावण्यासाठी पोलिसांनी आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. एका सीसीटीव्हीत आरोपी मुलीसोबत दिसला. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल करत वडिलांनी तिची हत्या केल्याचा खुलासा केला. यानंतर पोलिसांनीही आरोपी वडिलांनाही ताब्यात घेतलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 12, 2019 1:15 pm