मुलाने त्याच्या प्रेयसीसोबतचं नातं संपवण्यास नकार दिल्यामुळे संतापलेल्या ५२ वर्षीय वडिलांनी सात बाइक्सना आग लावली. त्यांनी स्वतःच मुलाला काही दिवसांपूर्वी एक बाइक गिफ्ट दिली होती. पण नंतर त्याच बाइकवर त्याला प्रेयसीसोबत फिरताना बघितल्यानंतर त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी हे पाऊल उचललं. तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये ही घटना घडली.

मुलाच्या ५२ वर्षीय वडिलांचं नाव कर्णन असून ते रिक्षाचालक आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, १४ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. कर्णनचा मुलगा अरुण आणि त्याची प्रेयसी मीना(बदललेलं नाव) लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पण दोघांच्या नात्याला कर्णन यांचा विरोध होता. कर्णन यांनी अरुणला मीनासोबतचं नातं संपवण्यासही सांगितलं होतं, पण त्याने नकार दिला.

नंतर काही दिवसांनी कर्णन यांनी अरुणला आणि मीनाला बाइकवर फिरताना बघितलं. काही दिवसांपूर्वीच मुलाला गिफ्ट दिलेल्या बाइकवर त्याच्या प्रेयसीला बघितल्यानंतर त्यांचा पारा अजूनच चढला आणि त्यांनी त्या बाइकलाच आग लावण्याचं ठरवलं. त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी त्यांनी पेट्रोल टाकून बाइकला आग लावली. आपल्यावर संशय येऊ नये यासाठी कर्णनने तिथे पार्क केलेल्या अन्य सहा बाइक्सवरही पेट्रोल टाकून आग लावली व घटनास्थळावरुन पळ काढला. घटना घडली त्या परिसरात एकही सीसीटीव्ही नव्हता, परिणामी सुरूवातीला पोलिसांना या घटनेचा तपास करताना काहीही हाती लागत नव्हते. पण, काही दिवसांनी अरुणच्या प्रेयसीने लिव्ह-इन पार्टनरच्या वडिलांकडून धमक्या येत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली. त्यानंतर पोलिसांनी १४ ऑक्टोबरपासूनच फरार असलेल्या कर्णनच्या मुसक्या आवळल्या. चौकशीदरम्यान त्यांनी आपला गुन्हा कबुल केला असून शनिवारी स्थानिक न्यायालयाने १२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.