सध्या सरकारकडून विरोधी पक्षांना लक्ष्य करण्यात येत असून त्यासाठी शासकीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला. नॅशनल हेराल्ड प्रकरणात शनिवारी न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर सोनिया दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पत्रकारांशी बोलत होत्या. सरकार सध्या शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना लक्ष्य करत आहे. मात्र, त्यामुळे आमच्यापैकी कोणीही घाबरणार नाही. या सगळ्याविरुद्ध आमचा लढा आणि संघर्ष सुरूच राहील. राजकीय विरोधकांनी आम्हाला नेहमीच लक्ष्य केले असून हे पिढ्यान पिढ्या सुरू आहे. मात्र, आम्ही कायम त्यांच्याविरुद्ध लढा देत आलो आहोत आणि यापुढेही लढत राहू. सत्य एक दिवस नक्की समोर येईल, असे सोनिया गांधींनी यावेळी सांगितले.
सोनिया आणि राहुल गांधी आज नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या सुनावणीसाठी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात उपस्थित होते. यावेळी न्यायालयाकडून त्यांना प्रत्येकी ५० हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. या सुनावणीनंतर सोनिया आणि राहुल गांधी यांचे दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे आरोप करून, बदनाम करून विरोधकांना झुकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. मात्र, मी आणि काँग्रेस पक्ष झुकणार नाही. नरेंद्र मोदींना काँग्रेस मुक्त भारत हवा आहे. मात्र, आम्ही तसे होऊ देणार नाही, असे राहुल यांनी ठणकावून सांगितले.