जम्मू काश्मीरमधील कठुआ #KathuaRape येथील बलात्कार प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. कठुआमधील आठ वर्षांच्या चिमुरडीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या केल्याची घटना १७ जानेवारी रोजी समोर आली होती. या प्रकरणात सोमवारी पोलिसांनी आठव्या आरोपीविरोधातही आरोपपत्र दाखल केले. या घटनेची वाच्यता झाल्यानंतर सर्वच माध्यमातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे माणुसकी हरवत चालल्याची प्रतिक्रिया सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर दिली.

टेनिसपटू सानिया मिर्झाने याप्रकरणी ट्विट केलं. ‘जगभरात आपल्या देशाची ओळख अशाप्रकारे निर्माण व्हावी असं आपण इच्छितो का? आपला धर्म, लिंग, जात, वर्ण या गोष्टी बाजूला सारून जर आपण या घटनेविरोधात उभं राहू शकत नाही तर या जगात आपल्या अस्तित्वाला काहीच महत्त्व राहणार नाही, माणुसकीलाही नाही,’ अशा शब्दांत सानियाने तिचा राग व्यक्त केला. तर अभिनेत्री सोनम कपूरनेही जळजळीत शब्दांत टीका केली. ‘स्वत:ला हिंदू आणि या देशाचे नागरिक म्हणवणाऱ्यांची लाज वाटतेय. माझ्या देशात अशा घटना घडत आहेत हे पाहून मला विश्वासच बसत नाही,’ अशी संतप्त प्रतिक्रिया तिने दिली.

क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनेही ह्रदयाला पिळवटून टाकणारी ही घटना असल्याचं सांगत व्यक्त होण्यासाठी शब्द सुचत नसल्याचं म्हटलं आहे. ही मानवतेची हत्या असून न्याय मिळालाच पाहिजे अशी भावनाही त्यानं व्यक्त केली आहे.

त्या आठ वर्षाच्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे अशी भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत असून अनेक बॉलीवूड कलाकारांनीही न्यायाची मागणी केली आहे. या देशात असं काही घडतंय यावरच विश्वास बसत नाहीये असं सोनम कपूरनं म्हटलंय तर ड्रग दिलेलं असताना, सामूहिक बलात्कार होत असताना त्या आठ वर्षांच्या मुलीची काय मानसिक स्थिती असेल असा प्रश्न फरहान अख्तरने विचारला आहे. जर ती दहशत तुम्हाला जाणवली नसेल तर तुम्ही माणूस नाही असंही त्यानं म्हटलंय.

रितेश देशमुख म्हणाला की एका मुलीवर ड्रग देऊन बलात्कार होतो व तिची हत्या होते तर दुसऱ्या प्रकरणात अत्याचार झालेल्या मुलीच्या वडिलांची पोलीस कोठडीत हत्या होते तिला न्याय हवाय. तुमच्याकडे पर्याय आहे, एकतर आवाज उठवा किंवा मूक प्रेक्षक व्हा, रितेशने म्हटलंय.

कठुआ बलात्कार प्रकरणाने फरहान हळहळला, ट्विट करुन म्हणाला…

फरहान अख्तर, रितेश देशमुख, रेणुका शहाणे यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियावर या घटनेविषयी तीव्र राग व्यक्त केला.