भारतीयांनी चीनी वस्तुंच्या वापरावर बहिष्कार टाकला पाहिजे असं मत व्यक्त करणारे प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी आपला दुसरा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी पहिल्यांदा केलेल्या व्हिडिओवर उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिली आहेत. वांगचुक यांनी चीनी मालावर बहिष्कार घालण्यासंबंधित पोस्ट केलेल्या व्हिडिओवर अनेकांनी त्यांना प्रश्न विचारले. याचपैकी चार महत्वाच्या प्रश्नांना त्यांनी दुसऱ्या एका व्हिडिओमधून उत्तर दिलं आहे. यावेळेस चीनवर बहिष्कार टाकणे शक्य असल्याचा विश्वास वांगचुक यांनी व्यक्त केला. यावेळेस बोलताना त्यांनी लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी सुरु केलेल्या स्वदेशी चळवळीची आठव करुन दिली.

“मी पहिला व्हिडिओ शूट केल्यानंतर मला अनेकांनी विचारलेला सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे, “चीनवर बहिष्कार का टाकायचा? हे द्वेष परसवण्यासारखं नाही का?,” असं म्हणत वांगचुक यांनी व्हिडिओची सुरुवात केली आहे. “हा द्वेष पसरवण्याचा निक्कीच प्रयत्न नाही. आपल्याला चीनी लोकांशी काहीही अडचण नाहीय. माझे अनेक मित्र आहेत चीनमध्ये. आपल्याला अडचण आहे चीन सरकारबरोबर आणि त्यांच्या धोरणांशी. चीन सरकारचे धोरण विस्तावरवादी आणि शोषण करणारे आहे. चीनच्या प्रत्येक गोष्टीवर जग शांत राहतं. त्यामुळे बहिष्कार टाकण्याचे जे आवाहन आहे तो एक गजर (सावध होण्याचा इशारा) आहे जो आपण जगाला देत आहोत,” असं वांगचुक म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी चीनमध्ये कशाप्रकारे धार्मिक तसेच कामगारांवर अत्याचार केला जात आहे हे ही सांगितलं. “चीनमध्ये १४० कोटी मजूर राबतायत बंदिस्तांप्रमाणे त्यांच्याकडून काम करुन घेतलं जातं. कोणी काही बोललं की त्याला गायब केलं जातं. पण जग शांत आहे कारण त्यांना चीनबरोबर व्यापार करायचा आहे. चीनमध्ये ६० लाखांपैकी १२ लाख तिबेटी बौद्ध धर्मिय मारले गेले. सहा हजार मंदीर आणि मठ तोडण्यात आले. तरी जग शांत आहे कारण आपल्याला चीनबरोबर उद्योग व्यवसाय करायचा आहे. युगुर्र मुस्लीमांबद्दल बोलायचं झालं तर त्यांची लोकसंख्या एक कोटी असून त्यापैकी १० लाख लोकं तुरुंगामध्ये बंदिस्त आहेत. हजारो मशिदी तोडण्यात आल्या आहेत. कारण जग व्यापार करण्याच्याच गोष्टी करतं चीनबरोबरच. श्रीलंकाच बघा चीनच्या कर्जाखाली दाबला गेला आहे. तेथील अमंतोता बंदर तर चीनच्या ताब्यात गेलं आहे. पाकिस्तान तर चीनने दिलेल्या कर्जात एवढा अडकला आहे की हा देशही एखाद्या गुलामाप्रमाणे होणार आहे. असं असलं तरी जग शांत कारण व्यापार करायचा आहे,” असं सांगत वांगचुक यांनी चीनमधील वस्तू या अत्याचाराशी संबंधित असल्याच्या दृष्टीकोनातून त्याकडे पाहिले पाहिजे असं म्हटलं आहे.

पुढे भारताबद्दल बोलताना, “माझ्यासाठी महत्वाचं काय आहे भारताच्या दाराजवळ काय होतं आहे. लडाखमध्ये चीन १९६२ पासून किती किमी आतमध्ये आला आहे. आमच्या इकडचे गुरं चारणारे लोकांची हक्काची कुरणं त्यात गेली आहेत. कुठे घेऊन जाणार ते त्यांच्या गुरांना आणि बकऱ्यांना. याबद्दल कोणीच काही बोलत नाही जग शांत आहे कारण आपल्याला व्यापार करायचा आहे. आपण त्यांना वाटेल तसं वागू देत आहोत. ते आपल्या सैनिकांना येऊन धक्काबुक्की करतात. असं असतानाच आपण त्यांना, “वो बेदर्दी से सर काटे मेरा और मे कहू उनसे हुजूर आहिस्ता आहिस्ता… जनाब आहिस्ता आहिस्ता..” एवढचं सांगायचं का? तर नाही आपल्याला असं सांगता येणार नाही आता आपल्याला उत्तर द्यायला हवं. आणि हे उत्तर आपण पाकिटाच्या माध्यमातून द्यायला हवं. अनेकदा निर्बंध वापरले जातात. एखादा देश चुकीचं काही करतो तेव्हा निर्बंध टाकले जातात. त्याच प्रकारे आपण आपल्या स्तरावर निर्बंध टाकायला हवेत,” असं वांगचुक म्हणाले.

या प्रश्नाला उत्तर देताना वांगचुक यांनी टिळकांनी सुरु केलेल्या स्वदेशी चळवळीची आठवणही करुन दिली. “आपल्या म्हणजेच भारतीयांना बहिष्कार टाकणं काही नवं नाही. आपण सर्वांनीच इतिहासामधील स्वदेशी मोहिम म्हणजेच ब्रिटीश मालावर बंदी घालण्याच्या मोहीमेसंदर्भात ऐकलं असेल. १०९५ पासून लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश सरकारविरोधात स्वदेशी आंदोलन सुरु झालं होतं. त्यावेळी आपण ब्रिटीश सरकारचे गुलाम झालो होतो. आता आपल्याला समजायला हवं की रोग होऊ नये यासंदर्भातील काळजी घेणं हे रोगापेक्षा अधिक फायद्याचं आहे. त्यामुळे आपण आतापासूनच बहिष्कार घालण्यास सुरुवात केली पाहिजे. उलट आपण काहीही न करता पाहत राहिलो तर तो गुन्हा ठरेल. अत्याचार करणं हा गुन्हा आहे तर अत्याचार सहन करणंही गुन्हाच आहे,” असं वांगचुक म्हणाले.