कर्नाटकमधील ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याच्या गूढ मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपविण्याचे आदेश काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिले असतानाही त्याबाबत कोणतीही घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली नाही. कोणालाही पाठीशी घालण्याचा सरकारचा इरादा नाही, सोमवारी विधानसभेत याबाबत भूमिका स्पष्ट करू, असे सिद्धरामय्या म्हणाले.
कर्नाटकमधील सनदी अधिकारी डी. के. रवी यांच्या गूढ मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा, अशी आग्रही मागणी सर्वच स्तरातून होत आहे. आम्हाला काहीही दडवून ठेवावयाचे नाही, आम्हाला कोणालाही पाठीशी घालावयाचे नाही, सत्य उजेडात आलेच पाहिजे अशीच आमची भूमिका आहे, असे सिद्धरामय्या म्हणाले.
सध्या या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागामार्फत सुरू आहे. हा विभागही सीबीआयप्रमाणे स्वतंत्र आहे, आम्हाला आमच्या पोलिसांच्या नीतिधैर्याचाही विचार केला पाहिजे. सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे सोमवारी सरकार आपली भूमिका स्पष्ट करील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.