लोकलेखा समितीचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी टू जी स्पेक्ट्रमप्रकरणीच्या अहवालातील निष्कर्षांसाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, असा आरोप महालेखापाल (कॅग) चे माजी अधिकारी आर.पी. सिंग यांनी केला आहे. या आरोपामुळे भारतीय जनता पक्षाचा या प्रकरणातील पोकळपणा स्पष्ट झाला असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शुक्रवारी केली.
जोशी यांनी या संदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी सरकारतर्फेही करण्यात आली आहे. जोशी यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. सिंग हे लोकलेखा समितीसमोर चौकशीसाठी आले होते. तेव्हा त्यांनी मौन का पाळले, अशी विचारणा त्यांनी केली. महालेखापालांनीही या प्रकरणी स्पष्टीकरण करावे, अशी मागणी माहिती व नभोवाणीमंत्री मनीष तिवारी यांनी केली. ते म्हणाले, ‘‘कॅगचे माजी अधिकारी आर.पी. सिंग यांनी उपस्थित केलेला मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. टू जी स्पेक्ट्रम घोटाळाप्रकरणी अहवालाचा मसुदा मे २०१० मध्ये तयार करण्यात आला, तेव्हा घोटाळ्यामुळे झालेल्या तोटय़ाचा आकडा २६४५ कोटी रुपये दाखविण्यात आला होता, पण नोव्हेंबर २०१० मध्ये हा अहवाल संसदेत मांडण्यात आला तेव्हा या आकडय़ाने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आणि तो १.७६ लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचला. तोटय़ाच्या आकडय़ात एवढा मोठा बदल झाला कसा, हा प्रश्न आहे. त्याबाबत कॅगने स्पष्टीकरण करणे गरजेचे आहे.’