संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं कौतुक केलं आहे. नितीन गडकरी यांनी देशातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी केलेल्या चांगल्या कामाचं सोनिया गांधी यांनी बाक वाजवून कौतुक केलं. काँग्रेसच्या इतर खासदारांनीही त्यांना साथ दिली. शून्य तासामध्ये सभागृहात नितीन गडकरींच्या मंत्रालयाशी संबंधित दोन प्रश्न घेण्यात आले. यावेळी देशभरात रस्त्यांचं जाळं उभारण्यासाठी गडकरींच्या मंत्रालयाकडून सुरु असलेल्या तसंच रखडलेल्या कामाची सविस्तर माहिती देण्यात आली.
‘मी येथे सर्व खासदारांचे आभार मानतो. राजकीय मतभेद विसरुन सर्व मंत्र्यांनी त्यांच्या मतदारसंघात माझ्या मंत्रालयाडून कऱण्यात आलेल्या कामांचं कौतुक केलं आहे’, असं यावेळी नितीन गडकरी यांनी सांगितलं.
नितीन गडकरी यांचं उत्तर पूर्ण झाल्यानंतर भाजपा खासदारांनी बाक वाजवून त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी मध्य प्रदेशातील खासदार गणेश सिंह यांनी उभं राहून लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासमोर आपण सर्वांनीच नितीन गडकरींनी केलेल्या सुंदर कामाचं कौतुक केलं पाहिजे असा प्रस्ताव ठेवला.
नितीन गडकरी बोलत असताना सोनिया गांधी शांतपणे सर्व ऐकत होत्या. गडकरींच्या काही उत्तरावर त्यांनी स्मितहास्य देत बाक वाजवून कौतुकही केलं. सोनिया गांधी यांना बाक वाजवताना पाहून काँग्रेसचे इतर खासदारांनीही त्यांना साथ देत नितीन गडकरींचं अभिनंदन करतात.
सोनिया गांधी यांनी गतवर्षी नितीन गडकरी यांना पत्र लिहून रायबरेलीतील रस्त्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर नितीन गडकरी यांनी दिलेल्या सकारात्मक उत्तरानंतर सोनिया गांधी यांनी त्यांचे आभार मानले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 7, 2019 4:36 pm