देशाची अर्थव्यवस्था आणि काँग्रेस नेत्यांवर झालेल्या कारवाईनंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नामोल्लेख टाळत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. “मिळालेल्या बहुमताचा अत्यंत धोकादायक पद्धतीने गैरवापर केला जात आहे, त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे”, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली.

तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीसह देशभरातील पक्ष बांधणीवर विचारमंथन करण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली देशभरातील नेत्यांची दिल्लीत बैठक सुरू आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सोनिया गांधी यांनी मोदी सरकारचा समाचार घेतला. त्या म्हणाल्या,”देशातील लोकशाही सध्या संकटात आहे. मिळालेल्या बहुमताचा अत्यंत धोकादायक पद्धतीने गैरवार होत आहे. घातक अजेंडा राबण्यासाठी महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरूषांचा विचार चुकीचा अर्थ सांगितला जात आहे”, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली.

अर्थव्यवस्थेसमोरील अरिष्ट आणि पी.चिदंबरम आणि शिवकुमार यांच्यावर झालेल्या कारवाईच्या संदर्भाने बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या,”अर्थव्यवस्थेची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. दिवसेंदिवस ही स्थिती ढासळत चालली आहे. या परिस्थितीवरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी इतिहासात कधीही उगवला नसेल असा राजकीय सूड सरकार घेत आहे”, असे शब्दात सोनियांनी मोदी सरकारला सुनावले.