पाणी डोक्यावरून जाऊ लागले की भल्याभल्यांना पाणी पाजण्याची हिंमत भारतीय लोकांमध्ये आहे, हे लक्षात ठेवा, असे सांगत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गेल्या दोन वर्षांतील अपयशापासून पळण्यासाठी मोदी सरकारकडून विरोधकांवर निराधार आरोप केले जात आहेत. पण या सरकारचे दिवस आता भरले आहेत, अशी टीका केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर केली.
काँग्रेस पक्षातर्फे शुक्रवारी ‘लोकतंत्र बचाओ’ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला संबोधित करताना सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. त्या म्हणाल्या, आम्हाला घाबरवण्याचा, बदनाम करण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून करण्यात येत आहे. पण आम्ही घाबरणार अजिबात नाही. आतापर्यंत सर्व आव्हानांचा सामना आम्ही केला आहे. संघर्ष करण्याची आमची वृत्तीच आहे. काँग्रेस पक्षाला कोणीही कमजोर समजण्याची चूक करू नये. राष्ट्रविरोधी शक्तीशी लढा देणे आमच्यासाठी नवे नाही. लोकशाही आणि मानवी मूल्यांची जपणूक करण्यासाठी वेळप्रसंगी प्राणांची आहुती देण्याचीही आमची तयारी आहे.
गेल्या दोन वर्षांत देशातील शेतकरी, युवक, बेरोजगार सर्वांचे चेहरे उदासीन आहेत. पण सरकारला त्याच्याशी काही देणेघेण नाही. सरकार डोळे झाकून शांत बसले आहे. त्यांना केवळ सत्तेची भूक आहे. त्यासाठी लोकशाही पद्धतीने निवडून आलेली राज्य सरकारे पैशांच्या जोरावर पाडून लोकशाहीची हत्या केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
समाजात फूट पाडून सर्वकाही आपल्या ताब्यात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असेही सोनिया गांधी यांनी यावेळी सांगितले.
यासभेसाठी देशातील वेगवेगळ्या राज्यातून काँग्रेसचे कार्यकर्ते नवी दिल्लीमध्ये जमले होते.