भाजपाचे खासदार मनोज तिवारी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी तसेच काँग्रसच्या सर्वेसर्वा असणाऱ्या सोनिया गांधी यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. एका निवडणुक प्रचारसभेदरम्यान बोलताना तिवारी यांनी सोनिया गांधींनी छट पूजा केली असती तर त्यांच्या पोटी हुशार मुलगा जन्माला आला असतं असे वक्तव्य केले आहे. या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रसने या वक्तव्याचा निषेध करत असल्या वक्तव्यांवरून मनोज तिवारी यांचे संस्कार दिसून येत असल्याचा पलटवार केला आहे.

ज्या महिला छट पूजा करतात त्यांच्या पोटी हुशार मुले जन्माला येतात. मात्र सोनिया गांधींने कधी छट पूजा केलीच नाही. त्यामुळेच सगळा गोंधळ झाला आहे अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी प्रचारसभेदरम्यान गांधी कुटुंबावर टिका करताना केले. व्हायरल व्हिडीओमध्ये मनोज तिवारी हे, ‘सोनिया गांधींनी छट पूजा केली असती तर त्यांच्या पोटी हुशार मुलगा जन्माला आला असता’ असं बोलताना दिसत आहेत. ‘छट पूजा करणाऱ्या महिलांच्या पोटी हुशार मुले जन्माला येतात. तसेच ही मुले देशभक्त तर असतातच शिवाय अशी मुले भ्रष्टाचारही करत नाहीत’ असेही आपल्या भाषणादरम्यान त्यांनी छट पूजेचे महत्व पटवून देताना सांगितले. सोनिया यांनी या पुढेतरी छट पूजा करावी असा सल्लाही तिवारी यांनी दिल्याचे व्हिडीओत दिसते. प्रसारमाध्यमांनी माझ्या या वक्तव्यावरून नवीन वादाला तोंड फोडू नये असा सल्लाही त्यांनी दिला. छत्तीसगडमधील एका प्रचारसभेत ही वक्तव्य केल्यानंतर काँग्रेसने अशा वक्तव्यांमधून तिवारींवरील संस्कार दिसून येतात असं सांगत त्यांना उत्तर दिले आहे.

वादग्रस्त विधानांमुळे तिवारी चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी तिवारी यांनी दिल्लीमध्येही आसामप्रमाणे राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (NRC) नियम लागू करण्याची मागणी केली होती. आपचे आमदार अमानतुल्लाह खान हे दिल्लीमधील त्यांच्या ओखला मतदारसंघामध्ये अनधिकृत भारतीयांना आश्रय देतात असा आरोप करताना तिवारींनी ही मागणी केली होती.