सोनिया गांधी यांचे मोदींना भावनिक प्रत्युत्तर

‘भारत हीच माझी मायभूमी आहे आणि आपल्याच लोकांच्या मातीत माझ्या देहाची राख मिसळेल,’ असे भावनिक प्रत्युत्तर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. नरेंद्र मोदी यांनी गेल्या तीन दिवसांत सोनिया गांधी या मूळच्या इटलीच्या असल्याचे वक्तव्य दोनदा केले. त्याला येथील निवडणूक सभेत गांधी यांनी प्रत्युत्तर दिले. हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणावरून मोदी यांनी गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला होता.

नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि विशेषत: आपल्याबद्दल जे भाष्य केले त्याबद्दल आपल्याला काही बोलावयाचे असल्याचे सोनिया या सभेत म्हणाल्या.भाषणाच्या अखेरीला त्यांनी आपल्याला राजकीय नव्हे तर काही वैयक्तिक गोष्टींबद्दल बोलावयाचे असल्याचे सांगितले. ‘होय, माझा जन्म इटलीत झाला. १९६८ मध्ये मी भारतात इंदिरा गांधी यांची सून म्हणून आले. आयुष्याची ४८ वर्षे मी भारतात वास्तव्य केले, ही माझी मायभूमी आहे, हा माझा देश आहे,’ असे सोनिया म्हणाल्या. तामिळनाडू आणि केरळमध्ये जाहीर सभेत मोदी यांनी जनतेला उद्देशून आपले इटालीत कोणी नातेवाईक आहेत का, अशी विचारणा केली होती त्याचा संदर्भ गांधी यांनी या वेळी दिला.

‘भारतातील ४८ वर्षांच्या वास्तव्यात संघ परिवार, भाजप आणि अन्य काही पक्षांनी आपला जन्म इटलीत झाला असल्याचे टोमणे मारले. एका प्रामाणिक मातापित्यांनी मला जन्म दिला, त्याची मला लाज वाटत नाही. इटलीत माझे नातेवाईक आहेत, ९३ वर्षांची वृद्ध आई आणि दोन बहिणी आहेत. मात्र मी भारतातच अखेरचा श्वास घेणार आणि माझ्या देहाची राखही याच मातीत मिसळणार,’ असे भावनिक होऊन सोनिया म्हणाल्या.

‘माझ्या प्रामाणिकपणाबद्दल मोदी यांनी कितीही शंका घ्यावी, परंतु भारताबद्दल मला किती प्रेम आहे ते सत्य मोदी हिरावून घेऊ शकणार नाहीत. मोदी यांना ही बाब कितपत समजेल ते मला माहिती नाही, मात्र तुम्हाला नक्कीच समजेल. – सोनिया गांधी

*(((   त्रिसूर येथील विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी जनतेला अभिवादन करताना.  )))