केरळमधील एका बांधकाम कंपनीचे पैसे थकविल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अन्य काही काँग्रेस नेत्यांविरोधात गुन्हा (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीतील पराभवामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या काँग्रेस पक्षाची डोकेदुखी यामुळे वाढली आहे.
याचिकाकर्त्यांचे वकील बाबू राज यांनी स्थानिक बांधकाम कंपनीने सोनिया गांधी यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आल्याचे सांगितले. नेयार येथील राजीव गांधी इन्स्टिटय़ुट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज या इमारतीचे काम या स्थानिक कंपनीकडे सोपविले होते. मात्र, हे काम पूर्ण होऊनही अद्याप २.८ कोटी रुपये कंपनीला देण्यात आलेले नाहीत. सोनिया गांधी यांच्यासह केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे (केपीसीसी) अध्यक्ष व्ही.एम. सुधीरन, माजी मुख्यमंत्री ओमान चंडी, केपीसीसीचे माजी अध्यक्ष, विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथाला आणि इन्स्टिटय़ुटचे अध्यक्ष हिदुर मुहम्मद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने बांधण्यात आलेल्या या इन्स्टिटय़ुटचे २०१३मध्ये सोनिया गांधी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. या कामाचे पैसे लवकरच बांधकाम कंपनीला देऊन २४ तासांमध्ये प्रकरण मिटविण्यात येईल. कंपनीकडून पाठविण्यात आलेल्या बिलाबाबत काही गैरसमज असल्यामुळे ही रक्कम देण्यात आली नव्हती, अशी माहिती विरोधी पक्षनेते चेन्नीथाला यांनी दिली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना विनाकारण या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केल्याचे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी म्हटले आहे.