काँग्रेसची आज इफ्तार पार्टी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावरून भाषण दिल्यानंतर पहिल्यांदाच माजी राष्ट्रपती  प्रणब मुखर्जी आणि यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी आमने-सामने येणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज, बुधवारी इफ्तार पार्टीचे आयोजन केले असून येथे  प्रणब आणि सोनिया दोघेही उपस्थित राहणार आहेत. या पार्टीसाठी चारशे जणांना निमंत्रित करण्यात आले असून विरोधी पक्षांतील प्रमुखांना आणि ज्येष्ठ नेत्यांनाही आमंत्रण दिले गेले आहे.

संघाचे निमंत्रण प्रणव यांनी स्वीकारल्यामुळे नाराज झालेल्या सोनिया गांधी यांनी त्यांचे विश्वासू अहमद पटेल यांच्या माध्यमातून ती व्यक्त केली होती. मात्र, भाषणानंतर  प्रणब  यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांचे समर्थन केले होते. इफ्तार पार्टीला प्रणव मुखर्जीना निमंत्रित केले जाणार नसल्याच्या चर्चेला राहुल गांधींनी पूर्णविराम दिला.  प्रणबदांना निमंत्रण पाठवण्यात आले असून ते त्यांनी स्वीकारलेही असल्याचे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी स्पष्ट केले.  प्रणबदा काँग्रेसचेच आहेत आणि विरोधकांची एकी कायम टिकवण्यासाठी प्रणवदांनाही आमंत्रण दिले पाहिजे असा मतप्रवाह पक्षात असल्याने राहुल गांधी यांनी प्रणव मुखर्जीना अखेर इफ्तार पार्टीला बोलावले आहे. त्यामुळे  प्रणबदा आणि सोनिया एकमेकांसमोर येणार आहेत.

या पार्टीला तृणमूल काँग्रेस, बसप, सप, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अन्य विरोधी पक्षांच्या प्रमुखांनाही आमंत्रित करण्यात आले असले तरी अनेकांच्या उपस्थितीबाबत सांशकता आहे. ही पार्टी सोनियांनी आयोजित केलेली नसल्याने ममता, मायावती उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. राहुल गांधी यांचे नेतृत्व स्वीकारण्यास अजूनही विरोधी पक्ष तयार नसल्याने पक्षांतील नेते उपस्थित राहतील मात्र, पक्षप्रमुख पार्टीत सहभागी होणार नसल्याचे सांगितले जाते.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर २०१४ मध्ये सोनिया गांधींनी इफ्तार पार्टी आयोजित केली होती. मात्र, त्यावेळी लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार हे दोघेच प्रमुख विरोधी पक्ष नेते उपस्थित होते. शरद पवारही या पार्टीला आलेले नव्हते. यावेळी मात्र विरोधकांची एकी किती घट्ट आहे याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.