‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात सोनिया, राहुलना जामीन; काँग्रेसची देशभरात निदर्शने
‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया व उपाध्यक्ष राहुल गांधी यांना शनिवारी विनाअट जामीन मंजूर केला. त्यानंतर थेट पक्ष कार्यालयाकडे रवाना झालेल्या सोनिया गांधी यांनी ‘आम्ही व काँग्रेस पक्ष कधीही कोणापुढे झुकलेलो नाही व यापुढेही मान तुकवणार नाही,’ असा घणाघात करत केंद्रावर टीकेची तोफ डागली. या जामीननाटय़ाच्या निमित्ताने कॉंग्रेसमध्ये मात्र चैतन्य आले. दिल्लीतील कॉंग्रेस मुख्यालय बऱ्याच काळानंतर गजबजले होते. मुख्यालयाबाहेर कॉंग्रेस खासदार, नेते तसेच कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन करून केंद्र सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले. मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमाही जाळण्यात आल्या.
सुमारे ९० कोटी रुपयांच्या या कथित भ्रष्टाचार प्रकरणाची सुनावणी शनिवारी पतियाळा हाऊस न्यायालयात झाली. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या गराडय़ात न्यायालयात दाखल झालेल्या सोनिया व राहुल यांना मुख्य महानगर दंडाधिकारी लवलीन यांनी प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा विनाशर्त जामीन मंजूर केला. या वेळी सोनिया यांच्यासाठी माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी तर राहुल यांच्यासाठी त्यांच्या भगिनी प्रियांका वढेरा यांनी हमी दिली. तक्रारकर्ते व भाजप नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी गांधी यांच्या परदेश प्रवासावर र्निबध घालण्याची विनंती केली होती; परंतु न्यायालयाने ती फेटाळली. या प्रकरणी पुढील सुनावणी २० फेब्रुवारी रोजी होईल. त्या वेळी आपल्या तक्रारीच्या पुष्टय़र्थ सर्व पुरावे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने स्वामी यांना दिले. मोतिलाल व्होरा, ऑस्कर फर्नाडिस आणि सुमन दुबे यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला, तर आणखी एक आरोपी सॅम पित्रोदा प्रकृतीअस्वास्थ्यामुळे न्यायालयात हजर राहू शकले नाहीत.

काँग्रेस मुख्यालय गजबजले एरवी शनिवारी सुट्टीमुळे सामसूम असलेला ल्यूटन्स झोन सकाळपासूनच गजबजला होता. सकाळी दहा वाजल्यापासूनच सुरक्षारक्षकांनी इंडिया गेटचे ‘गोल चक्कर’, काँग्रेस मुख्यालय, भाजप मुख्यालयाचा ताबा घेतला होता. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर काँग्रेस मुख्यालयात बऱ्याच कालावधीनंतर सुरक्षारक्षकांनी गर्दी केली होती. काँग्रेस मुख्यालयात दुपारी साडेबारापासूनच काँग्रेस खासदारांची वर्दळ वाढली. येणारा प्रत्येक खासदार समर्थकांसह येत होता. ‘लोकतंत्र के हत्यारो-शरम करो, शरम करो..’च्या घोषणा दिल्या जात होत्या. साडेतीनच्या सुमारास माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, अंबिका सोनी, मणिशंकर अय्यर, सलमान खुर्शीद काँग्रेस मुख्यालयात दाखल झाले.
सोनिया व राहुल गांधी यांचे पावणेचारच्या सुमारास काँग्रेस मुख्यालयात आगमन झाले. अकबर रस्ता तेव्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. काँग्रेस खासदार दाटीवाटीने एका सभागृहात बसले होते. राहुल व सोनिया गांधी यांचे स्वागत करण्यासाठी सर्वच नेत्यांची चढाओढ सुरू होती. सोनिया व राहुल यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
दरम्यान, मुख्यालयाबाहेर घोषणाबाजी सुरू होती. मोठमोठाली पोस्टर्स फडकवण्यात आली. थोडा वेळ थांबून राहुल व सोनिया मुख्यालयातून बाहेर पडले. तिकडे न्यायालयातील वर्दळ संपली होती. पण काही नेते उपस्थित होते. ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणी सोनिया व राहुल यांच्याव्यतिरिक्त मोतिलाल व्होरा, सुमन दुबे, सॅम पित्रोदा व ऑस्कर फर्नाडिस हेदेखील आरोपी आहेत. त्यांनाही जामीन मंजूर झाला. सॅम पित्रोदा न्यायालयात अनुपस्थित होते.

विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रातील सरकार यंत्रणांचा योजनाबद्ध वापर करत आहे. आम्ही व काँग्रेस पक्ष कधीही कोणासमोर झुकलेलो नाही. यापुढेही आम्ही मान तुकवणार नाही.
– सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्षा