काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सर गंगाराम रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दिल्लीच्या सर गंगाराम रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या शिमला या ठिकाणी सुट्टीसाठी गेल्या होत्या मात्र त्यांना अचानक पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. ज्यानंतर सोनिया गांधींना तातडीने दिल्लीत आणले गेले. दिल्लीत त्यांना सर गंगाराम रूग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर उपचारही सुरू होते. आज त्यांची प्रकृती सुधारल्यामुळे त्यांना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास  डिस्चार्ज देण्यात आला.  तसेच त्यांना काही दिवस आराम करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.’एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातला ट्विट केला आहे.

मागील वर्षभरात सोनिया गांधी यांची प्रकृती दोन ते तीनवेळा बिघडली. मध्यंतरीच्या काळात त्यांनी अमेरिकेत जाऊनही उपचार घेतले. या कारणांमुळेच  काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद हे राहुल गांधी यांच्याकडे दिले जाईल अशी चर्चा होती. अद्याप असा कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र लवकरच राहुल गांधींना काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद दिले जाऊ शकते अशीही शक्यता काँग्रेस मधील सूत्रांनी वर्तवली आहे.

शिमला या ठिकाणी प्रियांका गांधी यांचे घर बांधले जाते आहे. या घराच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी आणि सुट्टी घालवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या शिमला या ठिकाणी गेल्या होत्या. मात्र तिथे त्यांना पोटदुखीचा प्रचंड त्रास जाणवू लागला ज्यामुळे त्यांना दिल्लीतील गंगाराम रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर असल्याचे राहुल गांधी यांनीही ट्विट करून सांगितले होते.