काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केंद्रीय हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आपण आता निवृत्त होत असल्याचे स्पष्ट केले आहे. १६ डिसेंबरला दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात सोनिया गांधी काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द करतील. मात्र शुक्रवारीच त्यांनी आता आपण निवृत्त होत असल्याचे सांगितले.

मी राजकारणातून निवृत्त होत नसल्याचेही त्या सांगायला विसरल्या नाहीत. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काही पत्रकारांनी त्यांना काँग्रेसची पुढची पावले काय असतील असा प्रश्न विचारला ज्यानंतर त्यांनी मी आता अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचे म्हटले. मागील काही काळापासून सोनिया गांधींनी स्वतःला सक्रिय राजकारणापासून दूर ठेवले आहे.

गुजरात विधानसभा आणि हिमाचल विधानसभा निवडणुकांच्या प्रचारातही त्यांनी सहभाग घेतला नाही. त्यांची प्रकृती बिघडल्याच्याही काही बातम्या मध्यंतरीच्या काळात आल्या होत्या. त्यामुळेच त्या काँग्रेस अध्यक्षपदावर फार काळ राहणार नाहीत हे स्पष्ट झाले होते. अपेक्षेप्रमाणे राहुल गांधी हेच काँग्रेसचे नवे अध्यक्ष असतील हे पक्षाकडून सांगण्यात आले. त्यानंतर आता सोनिया गांधी यांनी आपण पदावरून निवृत्त होत असल्याचे म्हटले.

सोनिया गांधी या १९९८ मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या. मागील १९ वर्षात त्यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने दोनवेळा देशाची सत्ता काबीज केली. आता मात्र त्यांनी निवृत्त होणार असल्याचे सांगितले. काँग्रेसमध्ये राहुलराज सुरु होते आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशात सक्रिय असलेल्या आणि सगळ्यात जुन्या पक्षात आता बदलाचे वारे वाहू लागले आहेत यात शंका नाही. शनिवारी राहुल गांधींना अध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात येतील.

सध्या काँग्रेससमोर जनाधार वाढवण्याचे आव्हान आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक वर्षे काँग्रेसचेच सरकार होते. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने बाजी मारल्यापासून देशात काँग्रेसचा आलेख सातत्याने घसरतो आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीत सोनिया गांधींनी निवृत्तीची घोषणा केली आहे. आता नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी पक्षाला नवसंजीवनी मिळवून देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.