सरकार संघाची विचारसरणी लादत असल्याचा सोनियांचा आरोप

केंद्र सरकार विरोधक, नागरी समुदाय व विद्यार्थी यांची मुस्कटदाबी करीत आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत केला आहे. सोमवारी ही बैठक झाली, त्यात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रकरणात कन्हैया कुमार या विद्यार्थी नेत्याला अटक केल्यानंतरच्या घटनाक्रमावर सोनिया गांधी यांनी प्रथमच भाष्य केले. अर्थसंकल्पी अधिवेशनात हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुलाची आत्महत्या, जेएनयू प्रकरण व पठाणकोट हल्ला या तीन मुद्दय़ांवर सरकारला धारेवर धरण्याचे संकेत काँग्रेसने दिले आहेत.

संघावर ठपका

काँग्रेस कार्यकारी समितीने एक ठराव संमत केला असून त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शैक्षणिक संस्थांवर त्यांची विचारसरणी लादत असल्याचा आरोप केला आहे.

विद्यापीठे व महाविद्यालयात संघाचे विचार लादले जात आहेत, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी बैठकीनंतर सांगितले की, भाजप, रा. स्व. संघ व संबंधित संस्थांनी देशात अशांतता निर्माण करत आहेत.

प्रतिमा संवर्धनासाठी सरकार दक्ष

सरकारच्या दृष्टिकोनातून जे वृत्त नकारात्मक अथवा प्रक्षोभक असेल त्याचे तातडीने खंडन करण्यासाठी सरकारने विशेष ऑनलाइन माध्यम कक्ष स्थापन करण्याचे ठरविले आहे. दूरचित्रवाणी वाहिन्यांचे आणि वृत्तपत्रांचे ब्लॉग, वेब पोर्टल त्याचप्रमाणे फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यू टय़ूब यासारखे समाजमाध्यम यावर अहोरात्र लक्ष ठेवून त्याचे विश्लेषण करण्यासाठी राष्ट्रीय माध्यम विश्लेषण केंद्र स्थापन करण्याचे गेल्याच महिन्यात प्रस्तावित करण्यात आले होते. गेल्या ऑगस्ट महिन्यात सरकारने सर्व मंत्रालयांना शीघ्र प्रतिसाद पथके स्थापन करण्याचे आदेश दिले होते.

सरकारचा तोल ढळला आहे, लोकशाहीचे सगळे निकष पायदळी तुडवले जात आहेत. एखाद्या गोष्टीच्या तपशिलात जाणे, एखाद्या मुद्दय़ावर आव्हान देणे, चर्चा करणे व मतभेद व्यक्त करणे या गोष्टी दडपण्याचे प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे.

– सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्षा