रोहतांग बोगद्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते एका दशकापूर्वी कोनशिला बसविण्यात आली होती, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३ ऑक्टोबर रोजी त्याचे उद्घाटन होण्यापूर्वी ती कोनशिला हटविण्यात आली, असा आरोप हिमाचल प्रदेश काँग्रेसने केला आहे. येत्या १५ दिवसांत कोनशिला पुन्हा बसविण्यात आली नाही तर राज्यव्यापी निदर्शने केली जातील, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.

हिमाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रेमकुमार धूमल आणि केंद्रीय मंत्री वीरभद्र सिंह यांच्या उपस्थितीत सोनिया गांधी यांनी २८ जून २०१० रोजी कोनशिला बसविली होती, असे हिमाचल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कुलदीपसिंह ठाकूर यांनी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे. लाहौल-स्पितीच्या केलाँग येथे २००० मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जाहीर सभेत या प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानंतर २००२ मध्ये त्यांच्या हस्ते बोगद्याकडे जाणाऱ्या मार्गाचा पायाभरणी समारंभ करण्यात आला होता. सोनिया  यांनी बसविलेली कोनशिला १५ दिवसांत पुन्हा बसविण्यात आली नाही तर  राज्यव्यापी निदर्शने केली जातील, असा इशारा पक्षाने दिला आहे.