09 April 2020

News Flash

विषाणू रोखण्यासाठी सरकारला पाठिंबा!

डॉक्टरांना विशेष भत्ता द्यावा अशी मागणी

संग्रहित छायाचित्र

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या संचारबंदीला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. डॉक्टरांसाठी संरक्षक उपायोजना तसेच कर्ज वसुली पुढे ढकलणे अशी काही पावले केंद्राने उचलावीत अशी मागणी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. याबाबत सोनियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे.

करोनाने जगभरात थैमान घातल्याने देशवासियांमध्येही चिंता आहे असे सोनियांनी पत्रात नमूद केले आहे. लाखो जीव यामुळे धोक्यात आहेत. त्यामुळे देशाने एकजुटीने याचा मुकाबला केला पाहिजे. करोनाचा सामना करण्यासाठी सरकारने जे प्रत्येक पाऊल उचलले आहे त्याचे काँग्रेस पक्ष समर्थन करत असल्याचे सोनियांनी नमूद केले आहे. सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा विषयक पुरेशी साधने पुरवावीत अशी सूचना त्यांनी पत्रात केली आहे. डॉक्टरांना विशेष भत्ता द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

भविष्यात करोना मोठय़ा संख्येने पसरेल अशी धास्ती असलेल्या भागात मोठय़ा संख्येने अतिदक्षता केंद्र तसेच इतर साधने सज्ज ठेवावीत. याबाबतची माहिती देण्यासाठी एक संकेतस्थळ सुरू करावे. त्यावर रुग्णालये, त्यांचे दूरध्वनी क्रमांक ही सारी माहिती द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

अनेक कंपन्या हंगामी कामगारांची कपात करत असल्याने व्यापक अशा सामाजिक सुरक्षा देणाऱ्या उपाययोजना सरकारने आखाव्यात. कृषी क्षेत्राला या महत्त्वाच्या काळात फटका बसल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. आपली ६० टक्के लोकसंख्या कृषीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतमालाला भाव मिळण्याच्या दृष्टीने केंद्राने पावले उचलावीत. कर्ज वसुली स्थगित करावी अशी मागणी सोनियांनी केली आहे.

काँग्रेसच्या मागण्या

* प्रत्येक जनधन खात्यात साडे सात हजार रुपये जमा करावेत .

* सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक कुटुंबाला दहा किलो गहू किंवा तांदूळ मोफत द्या.

* नोकरदारांसाठी सर्व कर्ज हप्ते सहा महिने पुढे ढकलण्याचा विचार करावा तसेच क्षेत्रनिहाय मदत जाहीर करावी अशा प्रमुख मागण्या पत्रात आहेत

राहुल यांच्याकडून स्वागत

करोनामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी केंद्राने जी मदतीची घोषणा केली आहे त्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वागत केले आहे. योग्य दिशेने टाकलेले पहिले पाऊल,  असे सांगत शेतकरी, मजूर, महिला व ज्येष्ठ नागरिक यांना या संचारबंदीचा मोठा फटका बसला आहे. त्यांना मदत करणे महत्त्वाचे आहे, असे राहुल म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2020 12:40 am

Web Title: sonia gandhi support government to prevent virus abn 97
Next Stories
1 करोनाच्या मुद्दय़ावरून ‘डब्ल्यूएचओ’ चीनच्या बाजूने
2 VIDEO : मोदी सरकारने जाहीर केलेल्या भल्या मोठ्या पॅकेजमध्ये कुणाला काय मिळाले?
3 Coronavirus: इंडोनेशियात अडकले पुणे, मुंबईतील नागरिकांसह ३३ भारतीय; मदतीसाठी सरकारकडे विनंती
Just Now!
X