बिहार निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेस पक्षात संघटनात्मक बदल व्हावे यासाठी काँग्रेसच्या २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहली होती. पक्षातील त्या आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांशी सविस्तर चर्चा करण्यासाठी सोनिया गांधी यांनी आज १० जनपथ येथील निवासस्थानी बैठक बोलावली आहे. आज दिल्लीत सोनिया गांधींच्या निवासस्थानी ते २३ नेतेदेखील हजर असणार असून ही बैठक आयोजित करण्यासाठी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पुढाकार घेतल्याची माहिती आहे.

काँग्रेसने पक्षातील ५-स्टार संस्कृती सोडली पाहिजे आणि पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी नव्याने मोर्चेबांधणी केली पाहिजे असा सूर त्या २३ नेत्यांच्या पत्रात होता. त्या २३ नेत्यांवर काँग्रेसच्या निष्ठावंतांनी टीका केली होती. पण आज सोनिया गांधी या सर्व नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. काँग्रेस पक्षाला बळकट करणे आणि नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडणे या काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत डॉ. मनमोहन सिंह, एके अॅन्टनी, पी चिदंबरम, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, शशी थरूर, भूपिंदर सिंह हुड्डा, केसी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, हरीश रावत ही नेतेमंडळी असणार आहे. पक्षातील दोन बडे नेते म्हणजे राहुल गांधी आणि प्रियंका गांधीदेखील या बैठकील उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.