17 January 2021

News Flash

अध्यक्षपद तूर्त सोनियांकडेच!

काँग्रेस कार्यसमितीची बैठक वादळी : काही महिन्यांत नव्या अध्यक्षांची निवड

संग्रहित छायाचित्र

काँग्रेस कार्यसमितीची सोमवारची बैठक वादळी ठरली. मात्र, हंगामी पक्षाध्यक्षपदी सोनिया गांधीच कायम राहतील, असा निर्णय सात तासांच्या वादळी चच्रेनंतर  घेण्यात आला. करोनास्थिती निवळल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अधिवेशन बोलावले जाणार असून, त्यात नव्या अध्यक्षाची निवड होईल.

काँग्रेस नेतृत्व आणि पक्षसंघटनेच्या पुनर्रचनेची मागणी करणाऱ्या २३ ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या पत्राची दखल घेत कार्यसमितीच्या बहुतांश सदस्यांनी या नेत्यांवर तीव्र टीका केली. हे पत्र दुर्दैवी असून पक्षाध्यक्षांना कमकुवत करणे म्हणजे पक्षाला कमकुवत करण्यासारखे असल्याचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग म्हणाले. बैठकीत सोनिया आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवणारा ठरावही संमत करण्यात आला. गेल्या सहा महिन्यांमध्ये मोदी सरकारविरोधात सोनिया आणि राहुल हेच समर्थपणे उभे राहिले असून, त्यांचे हात बळकट केले पाहिजेत, असे ठरावात नमूद करण्यात आले.

पूर्णवेळ उपलब्ध असणारे, तसेच सामूहिक नेतृत्व असावे, जिल्हा स्तरापासून केंद्रीय स्तरावर निवडणुकीद्वारे सदस्यांची निवड करण्याची मागणी पत्रात करण्यात आली होती. यासंदर्भात बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र, सोनिया गांधींना पक्ष कारभारात मदत करण्यासाठी तसेच, पत्रातील मुद्यांवर विचार करण्यासाठी विशेष समिती नेमण्यात येणार आहे. सर्व ठरावांना पक्षनेतृत्वाला पत्र पाठविणारे नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, जितेंद्र प्रसाद, मुकूल वासनिक यांनीही पािठबा दिला. पक्ष संघटनेतील फेरबदलाचे सर्व अधिकार सोनिया गांधी यांना देण्याचा ठरावही संमत करण्यात आला, अशी माहिती संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल व प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत दिली. बैठकीला ५२ सदस्य उपस्थित होते.

नेत्यांना समज

बैठकीत सोनिया गांधी यांनी सामंजस्याची भूमिका घेतली. मात्र, ठरावात ‘बंडखोर पत्रप्रपंचा’बद्दल २३ नेत्यांना लक्ष्य करण्यात आले. देशासमोर करोना व अन्य संकट असताना, महत्त्वाच्या टप्प्यावर पक्ष व त्याचे नेतृत्व कोणीही कमजोर करू नये. मोदी सरकारने लोकशाहीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून तो हाणून पाडला पाहिजे. सोनिया आणि राहुल यांनी पक्षांतर्गत व पक्षाबाहेरही लोकांना मोदी सरकारविरोधात उभे राहण्यासाठी प्रेरित केले आहे. पक्षांतर्गत मुद्दे प्रसारमाध्यमांद्वारे जाहीर केले जाऊ नयेत. पक्षाची प्रतिष्ठा राखली जावी, असे ठरावांमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहेत. पक्ष शिस्तभंगाची कारवाई करणार असेल तर कोणतीही शिक्षा भोगण्यास आम्ही तयार आहोत. पण, आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत, अशी भावना आनंद शर्मा व मुकुल वासनिक यांनी बैठकीत व्यक्त केली. इंदिरा गांधी, संजय गांधी यांच्या काळापासून, कित्येक वष्रे काँग्रेसमध्ये आम्ही काम केलेले आहे, असे आझाद म्हणाले.

‘पदमुक्त करा’

काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया सुरू करावी आणि आपल्याला पदमुक्त करावे, अशी विनंती काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी कार्यसमितीच्या बैठकीच्या सुरुवातीला केली. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर गेल्या ऑगस्टमध्ये सोनिया गांधी यांनी हंगामी पक्षाध्यक्षाची सूत्रे हाती घेतली होती.

राहुल यांची टीका

सोनिया गांधींची प्रकृती ठीक नव्हती, त्या रुग्णालयात होत्या. त्याच काळात कसे पत्र लिहिले? मध्य प्रदेश आणि नंतर राजस्थानमध्ये पक्षांतर्गत संघर्ष सुरू होता. पक्षासमोर संकट उभे राहिले होते. अशा परिस्थितीत हे पत्र का पाठवले, असे प्रश्न विचारून राहुल गांधी यांनी पत्र लिहिणाऱ्या नेत्यांवर टीका केली.

आझाद, सिबल यांचे नाटय़पूर्ण घूमजाव

भाजपशी हितसंबंधातून पत्र लिहिल्याचा आरोप राहुल गांधी यांनी ज्येष्ठ नेत्यांवर केल्याचे वृत्त सर्वत्र पसरले होते. हे सिद्ध केले तर पक्षातील सर्व पदाचा राजीनामा देऊ, अशी आक्रमक भूमिका घेणारे गुलाम नबी आझाद यांनी राहुल गांधींच्या कथित विधानावर घूमजाव केले. कपिल सिबल यांनी राहुल यांना प्रत्युत्तर देणारे ट्वीट काढून टाकले.

काँग्रेसमध्ये वैचारिक मतभेदांना जागा आहे. त्यामुळे झाले-गेले विसरून पुढे गेले पाहिजे. पत्र लिहिणाऱ्या नेत्यांबद्दल माझ्या मनात कोणताही द्वेष नाही. करोना संकट, ढासळलेली अर्थव्यवस्था, चीनशी संघर्ष असे अनेक प्रश्न देशासमोर आहेत. त्यासाठी भाजपविरोधात काँग्रेसने एकत्रितपणे उभे राहिले पाहिजे.

– सोनिया गांधी, हंगामी अध्यक्ष, काँग्रेस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 12:15 am

Web Title: sonia gandhi will remain the interim party president abn 97
Next Stories
1 आझाद, सिबल यांचे नाटय़पूर्ण घूमजाव !
2 माफी मागण्यास प्रशांत भूषण यांचा पुन्हा नकार
3 अमेरिकेत विस्कॉन्सिन पोलिसांचा कृष्णवर्णीय व्यक्तीवर गोळीबार
Just Now!
X