करोनाशी लढा देण्यासाठी देशभरात लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. हा लॉकडाउन सर्वात जास्त परिणाम करतो आहे तो हातावरचं पोट असलेल्या सगळ्यांवर. अशा सगळ्या लोकांची काळजी घ्या या आशयाचं पत्र काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे.

काय म्हटलं आहे पत्रात?
सध्या आपला देश एका कठीण काळाला सामोरा जातो आहे. अशात खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. या लॉकडाउनचा परिणाम हातावर पोट असलेल्या सगळ्यांवरच झाला आहे. लाखो लोकांना या लॉकडाउनचे चटके सहन करावे लागत आहेत. अशा प्रसंगात भारताने आपल्याकडे असलेला धान्यसाठा खुला करावा आणि कुणीही उपाशी झोपणार नाही याची काळजी घ्यावी.

गरीबांना ५ किलो धान्य मोफत देण्याचा तुम्ही घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. राष्ट्रीय अन्न-सुरक्षा कायद्यान्वये हा निर्णय घेण्यात आला आहे जो योग्यच आहे. अनेक लोकांच्या आयुष्यावर मात्र लॉकडाउनचा परिणाम होतो आहे. त्यासाठी मी तुम्हाला काही सुचवू इच्छिते.

५ किलो धान्याची मर्यादा ही १० किलोपर्यंत करण्यात यावी. तसेच सप्टेंबर २०२० पर्यंत हे धान्य मोफत द्यावे

ज्यांना अन्नासाठी वणवण करावी लागते आहे त्या सगळ्यांनाच हे धान्य उपलब्ध करुन द्यावे

सध्या जे संकट देशावर घोंघावतं आहे त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना सर्वाधिक झळ सहन करावी लागणार आहे. आपल्या देशाची लोकसंख्या २०११ पासून वाढते आहे. त्यामुळे अशा सगळ्यांना दोनवेळचे अन्न मिळेल याची व्यवस्था करावी

येत्या काळात धान्य महागण्याची चिन्हं आहेत. तरीही सरकारने थोडी झळ सोसावी आणि गरीबांना दोनवेळचे अन्न मिळेल यासाठी शक्य त्या सगळ्या उपाय योजना कराव्यात असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

मागच्या आठवड्यातही सोनिया गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले होते. त्या पत्रातही त्यांनी काही सूचना मांडल्या होत्या. त्याचप्रमाणे याही पत्रात त्यांनी काही सूचना मांडल्या आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर काही विचार करुन निर्णय घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.