काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व त्यांचे पुत्र राहुल ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. शनिवारी दिल्लीच्या महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
सोनिया-राहुल जामिनासाठी अर्ज न करता स्वतला अटक करून घेतील व काँग्रेस या प्रकरणाचा वापर भाजपविरोधात राजकीय हवा तापविण्यासाठी करून घेईल, अशी अटकळ बांधली जात होती, पण सर्व कायदेशीर मार्गाचा विचार सुरू असल्याचे सांगत काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी जामिनाच्या पर्यायाचीही चाचपणी सुरू असल्याचे अप्रत्यक्षरीत्या सूतोवाच केले. भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यावरून काँग्रेसने संसदेत मोठे वादंग उठविले होते.