समलैंगिक संबंध बेकायदा ठरवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या निर्णयामुळे काही नागरिकांच्या घटनादत्त अधिकार आणि स्वातंत्र्यावर गदा आली आहे. संसदेत काँग्रेसतर्फे हा मुद्दा उपस्थित केला जाईल आणि यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सोनिया गांधी यांनी सांगितले. तर राहुल यांनीही हा अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच असल्याचे म्हटले.
‘‘भारतीय राज्यघटनेने आपल्याला उदार मतवाद आणि मुक्तपणा हे अधिकार दिले आहेत. ज्याद्वारे कोणताही भेदभाव आणि पूर्वग्रह वज्र्य आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय भेदभाव करणारा आहे. आपली संस्कृती सर्वसमावेशक आणि सहिष्णू आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने मानवाच्या मूलभूत अधिकारांवर कुऱ्हाड चालवणारे प्राचीन व अन्यायकारी नियम हटवले, हे योग्यच झाले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवल्याने आपण निराश झालो आहोत, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

कुणाशी लैंगिक संबंध ठेवायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक मुद्दा आहे. आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे. त्यामुळे समलैंगिक संबंधांना बेकायदा ठरवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अयोग्य आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णयच योग्य होता, असे मला वाटते. – राहुल गांधी