‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व त्यांचे पुत्र राहुल शनिवारी दुपारी न्यायालयात हजर होणार आहेत. त्यावेळी गांधी कुटुंबीय जामिनासाठी अर्ज न करता न्यायालयीन कोठडीचा पर्याय स्वीकारून भाजपच्या विरोधात राजकीय हवा तापवण्याचा प्रयत्न करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कायद्यानुसार आरोपीला समन्स बजावल्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर होऊन जामिनासाठी विनंती करावी लागते. जर आरोपीने जामीन अर्ज केला नाही वा तो मंजूर झाला नाही, तर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात येते. सोनिया आणि राहुल मात्र जामिनासाठी अर्ज न करता आपल्याला अटक करून घेत हा राजकीय मुद्दा बनविणार असल्याची चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपला अडचणीत आणण्यासाठी काँग्रेसकडून ही खेळी खेळण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. वकिलांच्या सल्ल्यानुसार या प्रकरणी निर्णय घेण्यात येईल, असे सांगत काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला. गांधी कुटुंबीयांची बाजू मांडणारे अभिषेक सिंगवी यांनीही काँग्रेसच्या धोरणाबाबत काहीही सांगण्यास असमर्थता दर्शवली.