लोकसभेच्या निवडणुका लवकर म्हणजे मुदतीपूर्वी होण्याची शक्यता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी फेटाळून लावली आहे. नॅशनल मीडिया सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केले. आमचे उद्दिष्ट पाच वर्षे पूर्ण करण्याचे आहे, असे सोनिया गांधी यांनी या वेळी सांगितले. अन्न सुरक्षा विधेयक व जमीन अधिग्रहण विधेयक मंजूर झाल्यानंतर काँग्रेस लगेच लोकसभा निवडणुका जाहीर करील, अशी एक अटकळ आहे त्यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर गांधी यांनी सुरुवातीला मुदतीपूर्वी निवडणुका होणार नाहीत असे सांगितले, पण तोच प्रश्न दुसऱ्या एका वार्ताहराने विचारला असता आपण काही सांगू शकत नसल्याचे स्पष्ट केले. वारंवार वार्ताहरांनी विचारले असता त्यांनी आम्ही शेवटापर्यंत जाणार आहोत, असे उत्तर दिले.
पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात लोकसभा निवडणुका होणे अपेक्षित आहे परंतु या निवडणुका याच वर्षी नोव्हेंबरमध्ये काही राज्यातील विधानसभा निवडणुकांबरोबर घेतल्या जातील अशी चर्चा सुरू झाली. भाजपनेही आर्थिक पेचप्रसंग सुरू असताना आता सरकारने जनमताचा कौल घ्यावा, अशी मागणी केली आहे.
पुढील निवडणुकीनंतर यूपीएच सत्तेवर येईल असा विश्वास श्रीमती गांधी यांनी व्यक्त केला असून सत्ताधारी आघाडीने लोकांना जे अधिकार दिले आहेत तोच आमचा यूएसपी आहे , असे त्या म्हणाल्या.
यूपीए सत्तेवर येईल काय व कुठल्या मुद्दय़ावर निवडणुका लढवणार आहात, असे विचारले असता त्या म्हणाल्या, की यूपीए पुन्हा सत्तेवर येईल याची १०० टक्के खात्री वाटते,  आम्ही लोकांना अनेक अधिकार दिले आहेत, त्यात माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार व आता अन्नाचा अधिकार यांचा समावेश आहे, हे अधिकार प्रदान केले हा आमचा यूएसपी आहे व त्यावरच निवडणुकीत भर दिला
जाईल.
अन्न सुरक्षा विधेयकाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, की हे विधेयक विचारार्थ संसदेपुढे आहे ते कदाचित पुढील आठवडय़ात मंजूर होईल. विधेयक मंजुरीत भाजप मदत करील काय, या प्रश्नावर त्यांनी सांगितले, की आपण ते कसे
सांगणार.
तेलंगणाच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, की अ.भा.काँग्रेस समितीच्या पथकाचे प्रमुख ए.के.अँटनी याबाबत संबंधितांच्या समस्या जाणून घेत आहे, सरकारही त्यावर समिती स्थापन करणार आहे.