नवी दिल्ली : आसामचे पुढील मुख्यमंत्री कोण, ते अद्याप गुलदस्त्यात असतानाच या पदाचे दावेदार असलेले सर्वानंद सोनोवाल आणि हिमंत विश्वा सरमा यांनी येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

भाजप विधिमंडळ पक्षाचे बैठक रविवारी गुवाहाटीत होण्याची शक्यता असून पुढील सरकारबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तेथे मिळतील, असे सरमा यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.

आसामचे विद्यमान मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि आरोग्यमंत्री सरमा यांना शुक्रवारी केंद्रीय नेतृत्वाने दिल्लीत पाचारण केले होते. त्या वेळी आसामच्या नेतृत्वाच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. सोनोवाल, सरमा, नड्डा, शहा आणि पक्षाचे सरचिटणीस (संघटना) बी. एल. संतोष यांच्यात चर्चेच्या तीन फेऱ्या झाल्या. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांनी सोनोवाल आणि सरमा यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. तर चर्चेच्या तिसऱ्या फेरीच्या वेळी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी दोन्ही नेत्यांची एकत्रित भेट घेतली. आसाममध्ये सरकार स्थापन करणे आणि पुढील मुख्यमंत्री कोण, या बाबत प्रामुख्याने चर्चा झाली.

सोनोवाल आणि सरमा हे नड्डा यांच्या निवासस्थानी स्वतंत्रपणे पोहोचले, मात्र बैठकीनंतर दोन्ही नेते एकाच गाडीतून रवाना झाले.