जापानच्या सोनी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा भारतीय बाजारपेठेत मोबाईल उत्पादनावर लक्ष केंद्रीत करण्याचा मानस आहे. त्यानुसार मोबाईल क्षेत्रात नवनविन वैशिष्ट्यपूर्ण मोबाईल फोन्स दाखल करण्याचे कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत.
“टेलिव्हीजन उत्पादन ही सोनी इंडिया कंपनीची प्राथमिकता आणि मुख्य उत्पादन क्षेत्र आहे. परंतु, मोबाईल क्षेत्राचे वाढते महत्व लक्षात घेता त्यानुसार बदल करणेही गरजेचे आहे. कंपनीच्या एकूण नफ्यातील नऊ टक्के वाटा हा मोबाईल क्षेत्राचा आहे.” असे सोनी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक केनीचीरो हीबी यांनी स्पष्ट केले.
२०१२-२०१३ या आर्थिक वर्षात सोनी इंडिया कंपनीने एकूण ८००० कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. मोबाईल व्यवसाय़ाबाबत पुढील योजनांबद्दल संचालक केनीचीरो म्हणाले, “मोबाईल उत्पादन क्षेत्रात आम्ही उशीरा पाऊल टाकले असल्यामुळे सध्या भारतीय बाजारपेठेत मोबाईल फोन्सवर भर देणे ही आमची प्राथमिक योजना आहे.”