ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी आपल्या थेट राजकीय भूमिकांमुळे कायम चर्चेत असतात. त्यांचा अनेकांवर मोठा प्रभाव असल्याचे पाहायला मिळतो. आता खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी करोनावरील घेतल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्याचा परिणाम थेट बिहारमध्ये जाणवत आहे.

फोटो व्हायरल झाल्यानंतर नागरिक लस घेण्यासाठी इच्छूक

खासदार ओवेसी यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर बिहारमधील मुस्लिम समाजातील लोकांनी हळूहळू लस घेण्यास सुरुवात केली आहे. याआधी ज्यांनी लस घेण्यास नकार दिला होता, आता ते सर्व लस घेण्यासाठी इच्छूक असल्याचे पाहायला मिळत आहे. इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. बिहारच्या सीमांचलमधील अररिया, पूर्णिया, कटिहार आणि किशनगंज हे जिल्हे मुस्लिम बहुल आहेत. त्यांची लोकसंख्या जवळपास १.२५ कोटी आहे. या भागात असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाचे ५ आमदार २०२० च्या विधानसभा निवडणुकीत जिंकले आहेत.

Corona Vaccination : राज्यांना केंद्र सरकारचा इशारा, लस वाया घालवली तर..

जिल्ह्या स्थानिक प्रशासनाने ओवैसी यांच्या पक्षाच्या आमदारांना मुस्लिम समाजातील लोकांना लस घेण्यास उद्युक्त करण्यासाठी सतत आवाहन करत होते. त्यानंतर आता गेल्या काही दिवसांत या भागातील नागरिकांनी लस घेण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी किशनगंजचे जिल्हाधिकारी आदित्य प्रकाश यांनी एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अख्तरुल इमान यांच्यासह इतर आमदारांशी भेट घेतली. लोकांमध्ये लसीकरणासंदर्भात मनात असलेल्या शंका आणि गोंधळ दूर करुन लस घेण्यास सांगावे असे आवाहन त्यांनी केले.

करोना लस प्रमाणपत्रातील चुका कशा सुधाराल, जाणून घ्या…

आमदार अख्तरुल इमान यांच्या म्हणण्यानुसार, ओवेसी यांनी ही लस घेतलेल्या फोटोचा देखील सीमांचल प्रदेशातील मुस्लिम समाजातील लोकांवर चांगला परिणाम होत आहे. पूर्वी ज्या पद्धतीने दलित समाजातील लोक पोलिओ लस घेण्यास घाबरत होते त्याच प्रकारे आज करोना लसीबाबतही परिस्थिती आहे, असे अख्तरुल इमान म्हणाले. सीमांचलच्या राजकारणात असदुद्दीन ओवेसी यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांना लस घेण्याची प्रेरणा मिळाली आहे. आधीच्या तुलनेत लसीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे अशी माहिती अख्तरुल इमान यांनी दिली.