विमान प्रवास करणाऱ्यांसाठी बोर्डिंग पास मिळवणं एखाद्या कटकटीपेक्षा कमी नसतं, गर्दी असल्यामुळे बोर्डिंग पास मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण आता तुमची बोर्डिंग पासच्या कटकटीतून सुटका होणार आहे. कारण, आता देशांतर्गत प्रवासादरम्यान बोर्डिंग पासची गरज लागणार नाही. तुमचा चेहराच तुमच्या बोर्डिंग पासचं काम करणार आहे. मात्र, ही सुविधा फक्त डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत विमान वाहतुकीसाठी लागू असणार आहे.

प्रवाशांना विमानतळावर बोर्डिंग पासशिवाय प्रवेश देण्यासाठी केंद्र सरकार चेह-याच्याद्वारे ओळख पटवण्याची व्यवस्था लागू करणार आहे. विमानतळ प्राधिकरण प्रवाशांसाठी कागदरहित प्रवेश देण्याच्या विचारात आहे. बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून चेह-याद्वारे ओळख पटवून आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशाचा चेहराच त्याचा बोर्डिंग पास होणार आहे. ही सुविधा दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बेंगळुरू या चार प्रमुख विमानतळांवर बसवण्यात येणार असून हळूहळू या सुविधेचा विस्तार केला जाणार आहे. हा नियम जगभरात लागू असून, चेहरा हे स्कॅनिंगच्या माध्यमातून ओळख पटवण्याचं प्रभावी माध्यम आहे. माणसाचा चेहरा हा एक सर्वात वेगळा असा बायोमेट्रिक इंडिकेटर आहे. चेहरा स्कॅन करतेवेळी चेहऱ्याच्या विविध भागांनुसार त्याच्या प्रतिमा घेतल्या जातील. त्यानुसार चेहरा व्यवस्थित स्कॅन करून मगच प्रवेश दिला जाईल. जर एखाद्याचं कपाळ झाकलेलं असेल किंवा अपघातामुळे चेहऱ्यावर काही जखम झाली असेल तरीही ही प्रणाली चेहरा व्यवस्थित ओळखू शकते. फक्त त्यासाठी प्रत्येक प्रवाशाला दर पाच वर्षांनी आपलं ताजं छायाचित्रं अपडेट करावं लागेल. देशांतर्गत हवाई प्रवास करणाऱ्यांसाठी हे नक्कीच आनंदाचं वृत्त आहे.