सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीला करोना महासाथीमुळे उशीर झाला असून, हा कायदा लवकरच अमलात येईल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी सोमवारी सांगितले.

उत्तर बंगालमधील समाजगटांच्या बैठकीत बोलताना नड्डा यांनी प. बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारवर त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे राजकीय हितसंबंध जपण्यासाठी ‘फोडा आणि राज्य करा’ धोरण राबवत असल्याचा आरोप केला. याउलट भाजप सर्वाच्या विकासासाठी काम करत असल्याचे ते म्हणाले.

जोवर सुधारित नागरिकत्व कायद्याचा संबंध आहे, तुम्हा सर्वाना त्याचा फायदा मिळेल. हा कायदा संसदेत संमत झाला असून आम्ही त्याच्या अंमलबजावणीला बांधील आहोत. करोनामुळे त्याची अंमलबजावणी लांबली आहे, मात्र आता परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. नियम तयार करण्यात येत असून लवकरच ते अमलात आणले जातील, असे नड्डा यांनी दलित, गोरखा, राजवंशी व इतर जमातींचा समावेश असलेल्या समाजगटांना सांगितले.