भारत लवकरच क्षेपणास्त्रांची पहिली बॅच निर्यात करण्याच्या तयारीत आहे. मंगळवार दि. १४ मे पासून सिंगापूरमद्ये तीन दिवसीय ‘आशियाई आंतरराष्ट्रीय समुद्री संरक्षण प्रदर्शना’ची सुरूवात झाली. या प्रदर्शनादरम्यान बोलताना, भारताने तयार केलेल्या क्षेपणास्त्रांच्या पहिल्या बॅचची निर्यात करण्यास तयार असून यासाठी सरकारची आवश्यक मंजुरी मिळणे बाकी असल्याची माहिती ‘ब्रह्मोस एअरोस्पेस’चे मुख्य महाप्रबंधक कमोडोर एस.के.अय्यर यांनी दिली. या प्रदर्शनात भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस कोलकाता’ आणि ‘आयएनएस शक्ती’ या युद्धनौका सहभागी झाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची निर्मिती करणाऱ्या ब्रह्मोस, लार्सन अँड टुब्रो यांसरख्या कंपन्यांनीही आतरराष्ट्रीय समुद्री संरक्षण प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. दरम्यान, दक्षिण पूर्व आशियातील अनेक देशांनी भारतीय क्षेपणास्त्र खरेदी करण्यास रस दाखवला आहे. ही भारताची पहिली निर्यात असून भारताने निर्माण केलेल्या क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी दक्षिण पूर्व आशियाई आणि आखाती देश इच्छुक असल्याचेही ते म्हणाले. भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी दक्षिण पूर्व आशियाई आणि आखाती देशांना करण्यात येणारी क्षेपणास्त्रांची निर्यात ही मोठी संधी मानली जात आहे. ‘आशियाई आंतरराष्ट्रीय समुद्री संरक्षण प्रदर्शना’मध्ये जगभरातील २३६ पेक्षा अधिक संरक्षण क्षेत्रातील कंपन्या सहभागी झाल्या आहेत.

दरम्यान, भारतीय संरक्षण उद्योगाच्या सहकार्याने निर्यात संधी उपलब्ध असल्याचे मत ब्रिटनच्या आंतरराष्ट्रीय व्यापार विभागाच्या संरक्षण आणि सुरक्षा संघटनेतील नौदलाचे वरिष्ठ सल्लागार कॅप्टन निक मॅकडोनाल्ड रॉबिन्सन यांनी मांडले. सध्या ब्रिटनमधील अनेक कंपन्या भारतातील अनुभवी कंपन्यांबरोबर व्यवसायिक संबंध प्रस्तापित करत असल्याचेही रॉबिन्सन म्हणाले. या प्रदर्शनानंतर भारतीय नौदलाच्या युद्धनौका आणि नौदलाचे पाळत ठेवणारे विमान ‘P-81’ हे सिंगापूर आणि भारतादरम्यान होणाऱ्या युद्धसरावात सहभागी होणार आहेत. १६ मे ते २२ मे दरम्यान भारत सिंगापूरदरम्यान संयुक्त युद्धसराव होणार आहे.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soon indian will export first batch of missiles brahmos chief general manager iyer
First published on: 15-05-2019 at 16:56 IST