लठ्ठपणा कमी करण्यासाठी लोक नाना तऱ्हेचे उपाय करतात; कुठे जिमला जा, कुठे डाएटिंग कर, पण आता वैज्ञानिकांनी अशी गोळी शोधून काढली आहे की, ज्यामुळे लठ्ठपणा कमी होतो. ही गोळी आतडय़ांचे नियंत्रण करणाऱ्या मेंदूतील केंद्राच्या जोडण्यांमध्ये बदल करून लठ्ठपणा टाळते कारण या फेरजोडण्या म्हणजे रिवायिरगमुळे तुम्हाला सारखी भूक लागत नाही व खा-खा होत नाही. ‘जर्नल ऑफ न्यूरोसायन्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले असून त्यात आतडय़ांचे नियंत्रण करणारे नवीन न्यूरॉन्स तयार करण्यात यश आले आहे. यात मूलपेशींची मदत घेतली आहे. हे प्रयोग अर्थातच उंदरांवर करण्यात आले आहेत.
पूर्व अँग्लिया विद्यापीठातील वैज्ञानिकांनी केलेल्या या संशोधनातून लठ्ठपणा व अन्न सेवनाच्या सवयी यांचा संबंध जोडून नवीन उपचार शक्य आहेत. वैज्ञानिकांनी झोप व जागे होणे, ऊर्जा खर्च, तहान, संप्रेरकांचे स्त्रवणे व इतर अनेक जैविक क्रियांचे नियंत्रण करणाऱ्या हायपोथॅलॅमस या मेंदूतील भागाचे संशोधन केले असता त्यांना मेंदूतील नेमक्या कोणत्या चेतापेशी आतडय़ाचे नियंत्रण करतात हे समजून घेतले.
जेनेटिक फेट मॅपिंग तंत्राने त्यांनी या भागाच्या विकसनाच्या वेळी तयार होणाऱ्या मूलपेशी व त्यापासून नंतर बनणाऱ्या विशिष्ट पेशी यांचाही मागोवा घेतला. त्यांच्या संशोधनात असे दिसून आले की, मेंदूतील टॅनीसायइटस नावाच्या पेशी या मूलपेशींसारख्या वर्तन करतात व नंतर नवीन न्यूरॉन्सची निर्मिती होते. उंदराच्या जन्मानंतर मूलपेशींच्या मदतीने आतडय़ाचे नियंत्रण करणाऱ्या जोडण्या म्हणजेच नवीन न्यूरॉन्स तयार होतात, ही क्रिया प्रौढावस्थेपर्यंत चालू राहते.
यातील प्रमुख संशोधक महंमद के. हाजिहोसेनी यांनी सांगितले की, डाएटिंग करण्याने लठ्ठपणावर कायमचा उपाय होत नाही. आम्ही जे संशोधन केले आहे त्यामुळे पुढे जाऊन लठ्ठपणावर कायमचा उपाय सापडणार आहे, कारण सारखे अन्न सेवन करण्याची प्रवृत्ती त्यामुळे कमी होऊ शकते.
हायपोथॅलॅमसमधील काही न्यूरॉन्सचे काम योग्य होत नसेल तर आपण जास्त अन्न सेवन करतो व त्यामुळे नंतर लठ्ठपणा येतो. आतापर्यंत असे समजले जात होते की, आतडय़ाचे नियंत्रण करणाऱ्या चेतापेशी या गर्भावस्थेतच तयार होतात व त्यात नंतर बदल करता येत नाही.
परंतु आताच्या अभ्यासानुसार आतडय़ाचे नियंत्रण करणारी मेंदूतील सर्किट्स (जोडण्या)या संख्येने निश्चित नसतात व त्यांच्या स्वरूपात बदल करून अन्न सेवनाच्या सवयींमध्ये बदल घडवून आणता येतात. यानंतर कुठली जनुके व पेशी क्रिया टॅनीसाईटसचे नियंत्रण करतात याची माहिती घ्यावी लागणार आहे, त्यानंतर आतडय़ाचे नियंत्रण करणाऱ्या न्यूरॉन्समध्ये औषधांच्या मदतीने काही बदल घडवता येतील.
जगात लठ्ठपणा हा मोठय़ा प्रमाणात आढळणारा आजार आहे व जगातील १.४ अब्ज प्रौढ लोकांचे वजन हे प्रमाणापेक्षा अधिक आहे तर ०.५ अब्ज लोक हे लठ्ठपणाचे शिकार आहेत.