वनस्पती सूर्यापासून मिळालेली जी ऊर्जा साठवत असतात तिचा वापर करून वीजनिर्मिती करण्याचा नवा मार्ग संशोधकांनी शोधून काढला असून, त्यात एका भारतीय संशोधकाचा समावेश आहे.सूर्यापासून मुबलक प्रमाणात ऊर्जा पृथ्वीवर येत असते, पण त्यात फार थोडा भाग आपण ऊर्जेत परिवर्तित करतो. जॉर्जिया अभियांत्रिकी विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक रामराजा रामसामी यांनी सांगितले, की प्रदूषणमुक्त असा स्वच्छ ऊर्जास्रोत ही काळाची गरज आहे. वनस्पतींनी मिळवलेली व साठवलेली सूर्याची ऊर्जा वापरून त्यापासून वीजनिर्मिती करण्याची क्षमता आपण एक दिवस प्राप्त करू शकू. वनस्पती या सौरऊर्जेचा वापर करतात. उत्क्रांतीमुळे त्यांची ही क्षमता वाढत गेली आहे. त्यांची शंभर टक्के क्षमता ही सूर्यापासून प्राप्त झालेली असते. वनस्पती सूर्यप्रकाशातील प्रत्येक फोटॉन पकडतात तेव्हा त्यापासून सारख्याच संख्येत इलेक्ट्रॉन निर्माण करतात. यातील थोडय़ा भागाचे रूपांतर विजेत करता आले तरी सौर पॅनेल्सची क्षमता वाढेल, हे सौर पॅनेल सध्या १२ ते १७ टक्के क्षमतेने काम करतात.
रामसामी यांनी सांगितले, की आम्ही प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा मार्ग शोधून काढला असून, त्यामुळे वनस्पती इलेक्ट्रॉनपासून शर्करा निर्माण करण्याच्या आधीच हे इलेक्ट्रॉन पकडून त्यांच्यापासून वीज तयार केली जाईल. रामसामी यांनी या प्रयोगात थायलाकॉइड या वनस्पतीपेशी वेगळय़ा केल्या, याच पेशी सूर्यप्रकाशापासून मिळणारी ऊर्जा साठवण्यास उपयोगी असतात. या थायलाकॉइड्समधील प्रथिनांमध्ये बदल करून वैज्ञानिकांनी इलेक्ट्रॉन प्रवाहात अडथळा निर्माण केला. नंतर सुधारित थायलाकॉइड्स हे अचल करून त्यांना कार्बन नॅनोटय़ूबचा आधार दिला. या नॅनोटय़ूब या केसापेक्षा पन्नास हजारपट सूक्ष्म असतात.
 नॅनोटय़ूब या विद्युतवाहक म्हणून काम करीत असतात. वनस्पतींमधील घटकातून इलेक्ट्रॉन पकडून ते वायरमध्ये सोडले जातात. लहान पातळीवरील प्रयोगात अपेक्षित निष्कर्ष मिळाले असून, त्यात वीजप्रवाहाची पातळी वाढलेली दिसून आली आहे. याच्या व्यावसायिक वापरासाठी आणखी बरेच संशोधन करावे लागेल असे रामसामी यांनी म्हटले आहे. कालांतराने हे तंत्रज्ञान सहजगत्या वाहून नेता येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरता येऊ शकेल. हे संशोधन जर्नल ऑफ एनर्जी अँड इनव्हिरॉनमेंटल सायन्स या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.