महिला आणि ज्येष्ठ नागरिकांविरोधातील गुन्हेगारीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. या पाश्र्वभूमीवर संकटसमयी तातडीने मदत मिळावी यासाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल, असे सुरक्षा उपकरण केंद्र सरकारतर्फे विकसित करण्यात येत आहे. या सुरक्षा उपकरणामुळे आपतकालीन परिस्थितीत नोंद केलेल्या मोबाइल क्रमांकावर संकटाची माहिती देणे शक्य होणार आहे. तसेच धोक्याच्या इशाऱ्याची कल्पनाही देता येणार आहे.
एखाद्या संकटाची चाहूल लागताच महिला तसेच ज्येष्ठ नागरिक या सुरक्षा उपकरणाच्या मदतीने धोक्याची घंटा वाजवू शकतात, तसेच नोंद केलेल्या मोबाइल क्रमांकावर धोक्याची माहिती पाठवू शकतात, अशी माहिती दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव राजीव गौबा यांनी दिली.
हे सुरक्षा उपकरण विकसित करण्यासाठी दिल्लीस्थित भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि थिरुवनंतपुरम येथील ‘सी डॅक’ या कंपन्यांची मदत घेण्यात येत असल्याचे गौबा यांनी सांगितले.  ‘शहरांची सुरक्षा २०१३’ या कार्यक्रमाबाबत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गौबा यांनी या सुरक्षा उपकरणाबाबत माहिती दिली. हे सुरक्षा उपकरण अधिकाधिक नागरिकांना स्वस्त दरात उपलब्ध व्हावे यासाठी मोठय़ा प्रमाणात त्याचे उत्पादन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महिलांच्या सुरक्षेसाठी उपयुक्त ठरू शकेल, असे हे सुरक्षा उपकरण मोबाइलच्या आकाराचे असेल, असे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.