पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याशी विमान प्रवासात आक्षेपार्ह वर्तन केल्याप्रकरणी ‘स्टॅण्डअप कॉमेडियन’ कुणाल कामरा याच्यावर चार विमान कंपन्यांनी प्रवासबंदी घातली आहे. या प्रकरणाचे पडसाद समाजमाध्यमांत उमटल्यानंतर दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे. एका बाजूला कुणाल कामराचे समर्थन करणारे तर दुसरीकडे विरोध करणारे असे दोन गट दिसून येत आहे. त्यातच आता कुणाल कामराने अर्णब यांच्या ऑफिसच्या बाहेर उभं राहत पोस्टरबाजी केली आहे.

काय आहे प्रकरण?

अर्णब गोस्वामी मंगळवारी ‘इंडिगो’ विमानाने मुंबई-लखनौ असा प्रवास करत होते. त्याच विमानातून प्रवास करणाऱ्या कुणाल कामरा याने गोस्वामी यांच्या आसनाजवळ जात आपल्या शैलीत विविध प्रश्नांचा भडिमार करून त्यांना भंडावून सोडले. याबाबतची चित्रफीत कामरा याने ट्विटरवर टाकल्यानंतर समाजमाध्यमांत त्याचे पडसाद उमटले.

कोणत्या विमान कंपन्यांनी घातली बंदी?

या संपूर्ण घटनेचे पडसाद समाजमाध्यमांवर उमटल्यानंतर ‘इंडिगो’ने कामरा याच्यावर प्रवासबंदी घालण्याचा निर्णय घेतला. सहप्रवाशाशी गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत ‘इंडिगो’ने ही कारवाई केली. ‘इंडिगो’पाठोपाठ ‘स्पाईसजेट’, ‘एअर इंडिया’ आणि ‘गोएअर’ या विमान कंपन्यांनीही कामरावर प्रवासबंदीचा निर्णय घेतला. ‘एअर एशिया’ने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून सूचना मिळाल्यानंतर कुणाल कामरा याच्याबाबत योग्य ती कारवाई करू, असे स्पष्ट केले तर ‘विस्तारा’ने या घटनेचा पूर्ण आढावा घेतल्यानंतरच पुढील पावले उचलली जातील, असे सांगितले.

केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री म्हणतात…

हा प्रकार चुकीचा असून, अशा घटनांमुळे सहप्रवाशांना त्रास होतो, असे सांगत केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी इतर विमान कंपन्यांनीही कामरा याच्यावर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

विमान कंपनीविरोधात हॅशटॅग

या प्रकाराचे समाजमाध्यमावर पडसाद उमटले. एकीकडे कामरा याच्या वर्तनावर नाराजी तर दुसरीकडे त्याच्यावर थेट प्रवासबंदीची कारवाई का करण्यात आली, असा सवाल करण्यात येत आहे. #बॉयकॉटइंडिगो हा हॅशटॅगही चर्चेत आला होता.

प्रवासबंदीनंतर कामराची पोस्टरबाजी

या प्रकरणावरुन समाजमाध्यमांवर वाद पेटलेला असतानाच कुणाल कामराने अर्णब गोस्वामींच्या वृत्तवाहिनीच्या कार्यालयाबाहेर जाऊन पोस्टरबाजी केली आहे. कुणालनेच त्याच्या फेसबुकवरुन यासंदर्भातील फोटो पोस्ट केला आहे. ‘माफी न मागण्याबद्दल माफ करावे’ अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आली आहे. फोटोमध्ये कुणाल एक पोस्टर घेऊन उभा असल्याचे दिसत आहे. ‘अर्णब तुला फक्त एवढचं सांगायचं आहे की मी केलेल्या गोष्टीचा मला काहीच खेद नाहीय,’ असा मजकूर या पोस्टरवर लिहिण्यात आला आहे.


अवघ्या तासाभरामध्ये अडीच हजारहून अधिक जणांनी कुणाल कामराची ही पोस्ट शेअर केली आहे.

कुणाल कामराचे म्हणणे काय?

“अर्णब गोस्वामी यांच्या वृत्तवाहिनीने रोहीत वेमुलाच्या मृत्यूनंतर केलेल्या वार्ताकनाची ही प्रतिक्रिया होती. मी कोणतीही विध्वंसक कृती केलेली नाही. मात्र, हवाई कंपन्यांनी केलेल्या प्रवासबंदीच्या कारवाईबद्दल आश्चर्य वाटत नाही,” असं मत कामराने व्यक्त केलं आहे.