भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली याला शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सौरव गांगुलीवर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. यादरम्यान सीपीआयचे ज्येष्ठ नेते अशोक भट्टाचार्य यांनी सौरव गांगुलीवर राजकारणात येण्यासाठी खूप दबाव असल्याचा दावा केला आहे.

“सौरव गांगुलीवर राजकारणात येण्यासाठी खूप दबाव असून काही जणांना राजकीय फायद्यासाठी त्याचा वापर करायचा आहे,” असा गंभीर आरोप अशोक भट्टाचार्य यांनी केला आहे. पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकीत सौरव गांगुली राजकीय कारकिर्दीला सुरुवात करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत सौरव गांगुलीने कोणतंही अधिकृत विधान केलेलं नाही.

अँजिओप्लास्टीनंतर सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर, करोना चाचणी निगेटिव्ह

शनिवारी ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर सौरव गांगुलीवर अँजिओप्लास्टी करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर बोलताना अशोक भट्टाचार्य यांनी म्हटलं आहे की, “काही लोकांना राजकीय फायद्यासाठी गांगुलीचा वापर करायचा आहे. यामुळे कदाचित त्याच्यावर दबाव आला असेल. गांगुली हा राजकीय घटक नाही. एक आदर्श खेळाडू म्हणूनच त्याची ओळख राहिली पाहिजे”.

“राजकारणात येण्यासाठी त्याच्यावर दबाव आणता कामा नये. मी गेल्या आठवड्यात सौरवला राजकारणात येऊ नको असा सल्ला दिला होता. त्यानेही माझ्या सल्ल्याचा विरोध केला नाही,” अशी माहिती अशोक भट्टाचार्य यांनी दिली आहे. अशोक भट्टाचार्य यांनी रुग्णालयात जाऊन सौरव गांगुलीची भेट घेतली.

अशोक भट्टाचार्य यांनी यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्यावर जोरदार टीका केली. “काही लोकांना प्रत्येक गोष्टीत राजकारण दिसतं. पण त्याच्या करोडो चाहत्यांप्रमाणे आम्हीदेखील सौरव लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना करतो,” असं ते म्हणाले.