पाकिस्तानात दहा वर्षांतील शक्तिशाली भूकंप

पाकिस्तान व अफगाणिस्तानात भूकंपाने मरण पावलेल्यांची संख्या आता ३४० झाली असून हा भूकंप ७.५ तीव्रतेचा होता. या भूकंपात १६०० जण जखमी झाले आहेत. या भूकंपात पाकिस्तानात २५० तर अफगाणिस्तानात ९० जण ठार झाले. पाकिस्तानातील गेल्या दहा वर्षांतील हा सर्वात शक्तिशाली भूकंप होता. पाकिस्तानातील खैबर पख्तुनवा भागात २१४ जण ठार झाले आहेत. पंजाबमध्ये ५ तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये ९ जण ठार झाले आहेत.
सुरुवातीला काल दुपारी २ वाजून ९ मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला, त्यानंतर एकूण सात धक्के बसले आहेत. त्यांची तीव्रता ४.८ दरम्यान होती, असे अमेरिकेच्या भूगर्भशास्त्रीय संस्थेने म्हटले आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हटले आहे, की पाकिस्तानात १६२० लोक जखमी झाले आहेत. अनेकांनी घराबाहेर राहून रात्र काढली. कडक थंडी असूनही लोक घरात गेले नाहीत. अफगाणिस्तानात ९० जण ठार झाले असून ३०० जण जखमी झाले आहेत, असे ‘एक्स्प्रेस न्यूज’ने म्हटले आहे. दरम्यान पंतप्रधान नवाझ शरीफ हे अमेरिका दौऱ्यावरून परतले असून त्यांनी मदतकार्यबाबत बैठक घेतली. पाकिस्तान लष्कराच्या मदत पथकाने नुकसानीचा अंदाज घेतला आहे.
लष्कराने म्हटले आहे, की ४५ ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यापैकी २७ ठिकाणी रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. काराकोरम महामार्गावर या दरडी कोसळल्या होत्या. लष्करी रुग्णालयांची क्षमताही उपचारांसाठी तीस टक्क्य़ांनी वाढवण्यात आली आहे.