चीनबरोबर मागील बऱ्याच काळापासून सुरु असणाऱ्या संघर्षानंतर तैवानने आज चीनचे सुखोई-३५ फायटर जेट पाडल्याची बातमी समोर आली आहे. चीन आणि तैवानने यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र एबीपी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार तैवानने आपल्या हवाई हद्दीत शिरलेल्या चीनच्या सुखोई-३५ वर निशाणा साधत ते पाडलं आहे. या हल्ल्यासाठी तैवानने अमेरिकन बनावटीच्या पेट्रियाट मिसाइल डिफेन्स सिस्टीमचा वापर केल्याचे सांगण्यात येत आहे. काही रिपोर्ट्सनुसार चीनने हे विमान तांत्रिक बिघाड झाल्याने पडल्याचं सांगितलं आहे.

प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार तैवानने चीनला अनेकदा हवाई सीमांचे उल्लंघन न करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतरही अनेकदा चिनी फायटर जेट्स तैवानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करत होती. आज तैवानने अखेर हवाई हद्दीचे उल्लंघन करणाऱ्या चिनी विमानाला लक्ष्य केलं. यामध्ये विमानाचा पायलट जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे दोन्ही देशांमधील संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मागील बऱ्याच काळापासून दक्षिण चीनच्या समुद्रामध्ये चीन आणि इतर शेजारी देशांमध्ये सीमा प्रश्नांवर खटके उडत आहेत. त्यातच चीनचा शेजारी असणाऱ्या तैवानमध्येही चीनविरोध वाढताना दिसत आहे. तैवानवरही हक्क सांगणाऱ्या चीनला तैवानने अनेकदा इशारा दिल्यानंतरही त्याकडे चीनने फारश्या गांभीर्याने लक्ष दिलं नाही. याच संघर्षामधून तैवानने चीनचे हे फायटर जेट पाडल्याचा दावा केला जात आहे. चीनच्या जखमी वैमानिकाला तैवानने ताब्यात घेतलं आहे.

संघर्षाची ठिणगी?

तैवानने हा हल्ला केल्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने अमेरिकने आपल्या नौदलाला सज्ज राहण्याचा इशारा दिल्याचेही वृत्त आहे. तैवानने खरोखरच हे जेट पाडलं असेल तर चीन आणि तैवानमधील युद्धाची ही ठिणगी ठरु शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळेच दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनविरोधी वातावरण असून सीमा प्रश्नावरुन अनेक देशांशी चीनचा वाद आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकने करोनाच्या मुद्द्यावरुन चीनशी वाद झाल्यानंतर पॅसिफिक महासागरामधील युद्ध नौकांची संख्या वाढवली आहे. ऑस्ट्रेलियानेही चीनविरोधी भूमिका घेतल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे सध्या दक्षिण चीनच्या समुद्रात संघर्ष झालाच तर चीन विरोधात इतर सर्व देश असं चित्र पाहायला मिळू शकतं.

तैवानचे स्पष्टीकरण

ही बातमी व्हायरल झाल्यानंतर काही तासांनी तैवानच्या हवाई दलाने स्पष्टीकरण देत आपण कोणतेही चिनी विमान पाडलेलं नाही असं स्पष्ट केलं आहे.

प्रसारमाध्यमांवरील बातम्या या अफवा असल्याचंही तैवानने म्हटलं आहे.