चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज

नवी दिल्ली : सर्वाधिक घातक असल्याचे भाकित वर्तविण्यात आलेले ‘फॅनी’ हे चक्रीवादळ  शुक्रवारी रौद्र रूप धारण करण्याची शक्यता असून त्याचे सावट संपूर्ण दक्षिण भारत आणि पूर्व किनाऱ्यावर आहे.

हे चक्रीवादळ ओदिशामध्ये धडकणार असून पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांनाही त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने त्याबाबत यापूर्वीच ‘हाय अलर्ट’ जारी केला असून या वादळाचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी केली आहे.

‘फॅनी’ प्रभावित राज्यांमधील रेल्वे आणि हवाई वाहतूक नियंत्रित करण्यात आली असून अनेक रेल्वे गाडय़ा आणि विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

नऊशेहून अधिक निवारे उभारण्यात आले असून नौदल, सागरी सुरक्षा दल आणि राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दल यांच्या तुकडय़ा तैनात करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

विमानतळांवरही सतर्कता

नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी फॅनी प्रभावित राज्यांमधील विमानतळांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. हवाई सेवा देणाऱ्या कंपन्यांनी या आपत्तीदरम्यान सहकार्य करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. ‘फॅनी’मुळे तिन्ही राज्यांमधील हवाई वाहतूक प्रभावित झाली आहे. गुरुवारी इंडिगो एअरलाइन्सने विशाखापट्टणमला जाणारी विमाने रद्द केली. कोलकाता आणि भुवनेश्वरला जाणारी विमानेही रद्द करण्यात आली असून शुक्रवारीही ही  विमानसेवा विस्कळीत  राहील.

९५ रेल्वेफेऱ्या रद्द

फॅनी चक्रीवादळामुळे होणारी हानी टाळण्यासाठी मागील दोन दिवसांत ओदिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश येथील जवळपास ९५ रेल्वेफेऱ्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. रद्द करण्यात आलेल्या गाडय़ांमध्ये हावडा-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस, पाटणा-एर्नाकुलम एक्स्प्रेस, नवी दिल्ली-भुवनेश्वर राजधानी एक्स्प्रेस, हावडा-हैदराबाद इस्ट-कोस्ट  एक्स्प्रेस, भुवनेश्वर-रामेश्वर एक्स्प्रेस यांचा समावेश आहे.   तर तीन विशेष रेल्वे या प्रभावित राज्यांमध्ये चालवण्यात येत आहेत. यातील रेल्वे पुरी-शालीमार, तसेच पुरी-हावडा मार्गावर चालवण्यात येत आहेत. कित्येक एक्स्प्रेसचा मार्ग बदलण्यात आला आहे.

‘एनडीआरएफ’च्या ८१ तुकडय़ा तैनात

‘फॅनी’ प्रभावित राज्यांमध्ये राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दल (एनडीआरएफ) ८१ तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. या तुकडय़ांमध्ये ४००० विशेष प्रशिक्षित जवान सहभागी झाले आहेत. ५० तुकडय़ा या ओदिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशमध्ये वादळापूर्वीच तैनात करण्यात आल्या असून ३१ तुकडय़ा वादळानंतर तैनात करण्यासाठी तयारीत ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती एनडीआरएफचे प्रमुख एस.एन. प्रधान यांनी दिली. या तुकडय़ांमध्ये डॉक्टर, अभियंते, पॅरामेडिक्स, पट्टीचे पोहणारे यांचा समावेश असून त्यासाठी आवश्यक सामग्री तयार ठेवण्यात आली आहे.