माजी लष्करप्रमुख आणि परराष्ट्र राज्यमंत्री व्ही के सिंह यांनी काश्मीर प्रश्नी भाष्य केले आहे. काश्मीरचा मुद्दा वाटतो तितका सोपा नाही. हे छुपे युद्ध आहे. हा एक असा मुद्दा आहे, ज्यासाठी आधीच तशी परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. एका घटनेच्या आधारावर कोणत्याही धोरणाच्या यश-अपयशाचे मूल्यमापन करू नये. ही चकमक होती, जिथे एका अधिकाऱ्यासह ३ जवान शहीद झाले. याचा अर्थ येथील परिस्थिती खराब आहे, असे नाही. तसेच दक्षिण काश्मीरमध्ये २००५ ते २०१२ या कालावधीत शांतता होती. २०१२ नंतर अशा घटनांमध्ये वाढीचे कारण काय आहे. याचे तुम्ही विश्लेषण केले आहे का, परिस्थिती का बिघडली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दगडफेक करणाऱ्यांबाबत सिंह म्हणाले की, काही युवकांना दगडफेक करण्यासाठी पैसे दिले जात आहेत. काही युवक वाहनांवर उभे राहून ओरडतात. यातून संपूर्ण काश्मीरच्या युवकांची भावना दिसत नाही. युवक पूर्वीही व्यस्त होते, भविष्यातही असतील. काश्मीरमध्ये भरपूर काम  करण्याची गरज असून अनेक कामे केलीही जात आहेत. काहीत यश आले तर काहींमध्ये नाही. यामुद्याकडे सरकार गंभीरपणे पाहत असून त्यासाठी योग्य ते पाऊल उचलले जात असल्याने मी सकारात्मक आहे.