चीनमधील करोना विषाणू आता दक्षिण कोरियात वेगाने पसरत असून तेथे आणखी १४२ रुग्ण सापडले आहेत त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या आता ३४६ झाली आहे. चीनबाहेर करोना रुग्णांची संख्या दक्षिण कोरियातच सर्वाधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे.

चेआँगडो येथील रुग्णालयात आणखी काही जणांच्या चाचण्या सकारात्मक आल्या असून डेगू येथील रुग्णांतही वाढ झाली आहे. नवीन रुग्णांत ९२ जण हे चेआँगडो  रुग्णालयातील रुग्ण किंवा कर्मचाऱ्यांशी संबंधित व्यक्ती आहेत. रुग्णालयात संशयितांची  तपासणी केली असता त्यांना लागण झाल्याचे दिसून आले, त्यात काही मनोरुग्णांचाही समावेश आहे. शनिवारी तेथे आणखी एकाचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या दोन झाली आहे.

शिंचेओनजी चर्च ऑफ जिझस येथे १५० जणांना करोनाचा संसर्ग झाला असून तो ६१ वर्षीय महिलेपासून  सुरू झाला. तिला १० फेब्रुवारीला ताप असताना ती चर्चमध्ये गेली होती.

दाएगूचे महापौर म्हणाले की, या शहराची  लोकसंख्या २५ लाख असून स्थानिक लोकांना घरात राहण्याची सूचना देण्यात आली आहे. प्रमुख अमेरिकी लष्करी तळाकडे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

केसीडीसीने म्हटले आहे की, शिंचेओनजी येथील ९३०० लोकांना वेगळे ठेवण्यात आले आहे. ५४४ जणांनी त्यांच्यात लक्षणे दिसत असल्याचे म्हटले आहे.  चेंओंगडो  हे ठिकाण दाएगूपासून दक्षिणेला २७ कि.मी अंतरावर असून तेथे संस्थापक ली मॅन ही यांच्या भावाचे निधन झाले.  त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असणाऱ्यांची तपासणी करण्याचे आदेश अध्यक्ष मून जे इन यांनी दिले आहेत.

दोन शहरांचे विशेष व्यवस्थापन

दक्षिण कोरियात करोनाच्या प्रसारामुळे दाएगू व चेओंगडो ही दोन शहरे विशेष व्यवस्थापन विभागात आणली असल्याचे पंतप्रधान चुंग से क्यून यांनी म्हटले आहे.